भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर आणि सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यात सुरु असलेला वाद आता संपलेला आहे. फारुख इंजिनीअर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय निवड समितीवर टीका करत, अनुष्का शर्माला चहा देणं हेच यांचं काम असल्याचं म्हटलं होतं. यावर अनुष्का शर्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्पष्टीकरण देत, चुकीच्या बातम्या पसरवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जाऊ नये असं म्हटलं.

अवश्य वाचा – अनुष्का शर्माला चहा देणं हेच यांचं काम, माजी भारतीय खेळाडूची निवड समितीवर खरमरीत टीका

या वादावर अखेरीस फारुख इंजिनीअर यांनी पडदा टाकला आहे. “मी बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट बोलून गेलो आणि तुम्ही त्यातून राईचा पर्वत केलात. अनुष्काला या प्रकरणात उगाचच खेचलं गेलं, ती खूप चांगली मुलगी आहे. विराट हा सध्याचा भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार आहे, तसेच रवी शास्त्रीही चांगली कामगिरी करतायत.” Republic TV शी बोलत असताना इंजिनीअर यांनी आपली बाजू मांडली.

दरम्यान पुण्यात दिलीप वेंगसरकर यांच्या क्रिकेट अकादमीला भेट द्यायला आलेले असताना इंजिनीअर यांनी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीला टिकेचं लक्ष्य केलं होतं. “प्रसाद आणि त्यांचे सहकारी म्हणजे Mickey Mouse Selection Committee असून ही लोकं फक्त अनुष्का शर्माच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये मग्शुल असतात. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत असंच चित्र होतं. मला हेच कळत नाही, की लोकं निवड समितीवर निवडून येण्यासाठी पात्र कशी ठरली? यांच्यापैकी किती लोकांनी किमान १०-१२ कसोटी सामने खेळले आहेत? त्यांच्यापैकी एकाला तर मी ओळखतही नव्हतो. विश्वचषकादरम्यान हा माणूस कोण आहे? असं विचारल्यावर मला तो निवड समितीचा सदस्य असल्याचं कळलं.”

अवश्य वाचा – निवड समितीवर टीका करण्यासाठी माझ्या नावाचा वापर करु नका ! अनुष्काचं माजी खेळाडूला प्रत्युत्तर

ज्यावर प्रत्युत्तर देताना अनुष्का शर्माने, “मी ज्या-ज्या वेळी विराटसोबत सामना पहायला आले आहे त्यावेळी मी सामन्याच्या तिकीटासह सर्व खर्च स्वतः केला आहे. विश्वचषकादरम्यान मी वेगळ्या स्टँडमध्ये आणि निवड समिती वेगळ्या स्टँडमध्ये बसली होती. खोट्या बातम्या पसरवण्यासाठी माझ्या नावाचा वापर होतो आहे. जर तुम्हाला निवड समितीच्या पात्रतेवरती टीका करायची आहे तर जरुर करा. मात्र स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी माझं नाव वापरु नका”, म्हणत आपली बाजू मांडली.

Story img Loader