पीटीआय, हैदराबाद
क्रिकेट कारकीर्दीत अनेक सन्मान झाले, पण कर्नल सी. के. नायडू यांच्या नावाने करण्यात आलेला सन्मान हा हृदयस्पर्शी क्षण असल्याची भावना क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी व्यक्त केली. रवी शास्त्री यांच्यासह माजी यष्टिरक्षक फारुख इंजिनियर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका खास सोहळ्यात ‘बीसीसीआय’कडून २०१९-२० पासूनच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
भारताच्या १९८३ मधील विश्वविजयी संघाचे शास्त्री सदस्य होते. त्यानंतर १९८५ मधील जागतिक बेन्सन अँड हेजेस मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शास्त्री यांची निवड झाली होती. ऑस्ट्रेलियात लागोपाठ दोन मालिका विजयाचे शास्त्री प्रशिक्षक या नात्याने मुख्य सुत्रधार होते. पुरस्कार सोहळ्यात शास्त्री आणि इंजिनियर यांचा सन्मान सर्वात लक्षवेधी ठरला.
हेही वाचा >>>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर बदलला निर्णय; वगळलेल्या खेळांचा शिवछत्रपती पुरस्कार यादीत समावेश
‘‘माझ्यासाठी हा खूप भावनात्मक प्रसंग आहे. चार दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटशी जोडल्या गेल्याचा हा सन्मान आहे. वयाच्या १७व्या वर्षी मी क्रिकेटची सुरुवात केली आणि वयाच्या तिशीत माझे क्रिकेट थांबले होते. त्यानंतरही ‘बीसीसीआय’ने माझी साथ सोडली नाही. त्यांनी मला खऱ्या अर्थाने खेळाचा मार्ग दाखवला. फारुख यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी, या खेळात फार पैसा नव्हता. पण, देशासाठी खेळण्याचा अभिमान होता,’’ असे शास्त्री म्हणाले.
या सोहळ्यात शुभमन गिलला २०२२-२३साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पदकाने गौरविण्यात आले. याच वर्षासाठी यशस्वी जैस्वालला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी सन्मानित करण्यात आले. महिला विभागात फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माला आंतंरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. दीप्तीला हा पुरस्कार २०१९-२०, २०२२-२३ असा दोन वर्षांसाठी मिळाला. त्याचवेळी २०२०-२१ आणि २०२१-२२साठी हा पुरस्कार महिला विभागात स्मृती मनधानाला मिळाला.
अन्य पुरस्कार
● पॉली उम्रीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू : जसप्रीत बुमरा (२०२१-२२), रविचंद्रन अश्विन (२०२०-२१), मोहम्मद शमी (२०१९-२०)
● सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष)- मयांक अगरवाल (२०१९-२०), अक्षर पटेल (२०२०-२१), श्रेयस अय्यर (२०२१-२२)
(महिला) : प्रिया पुनिया (२०१९-२०), शफाली शर्मा (२०२०-२१), एस. मेघना (२०२१-२२), अमनज्योत कौर (२०२२-२३)
● दिलीप सरदेसाई पुरस्कार (२०२२-२३): सर्वाधिक धावा: यशस्वी जैस्वाल; सर्वाधिक बळी: आर अश्विन.
● एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (महिला): पूनम राऊत (२०१९-२०), मिताली राज (२०२०-२१), हरमनप्रीत कौर (२०२१-२२), जेमिमा रॉड्रिग्ज (२०२२-२३).
● एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी – महिला: पूनम यादव (२०१९-२०), झुलन गोस्वामी (२०२०-२१), राजेश्वरी गायकवाड (२०२१-२२), देविका वैद्या (२०२२-२३).
● देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी: मुंबई (२०१९-२०).