एकीकडे अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जात आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा या विश्वचषकातील संघांच्या कामगिरीवर खिळल्या आहेत. पण त्याचवेळेस साहिल चौहान नावाच्या एका खेळाडूने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. नामिबियाच्या जॉन निकोल लॉफ्टी-ईटनने या वर्षी फेब्रुवारीमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३३ चेंडूत शतक झळकावले होते. पण आता एस्टोनियाच्या साहिल चौहानने त्याच्यापेक्षा कमी चेंडूत म्हणजेच अवघ्या २७ चेंडूत शतक झळकावले आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच कोणत्याही व्यावसायिक क्रिकेटमधील सर्वात वेगवान टी-२० शतक आहे.

साहिल चौहानने सायप्रसविरुद्ध टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अवघ्या २७ चेंडूत शतक झळकावले. १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्या १३ चेंडूत त्याने शतक झळकावले. १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इस्टोनियाने ९ धावांत दोन विकेट गमावल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या साहिलने षटकारासह आपले खाते उघडले. यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर १० धावा झाल्या अन् त्याने धावांचा पाऊस पाडायला सुरूवात केली.

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

साहिल चौहान टी-२० सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला फलंदाज

साहिलने ४१ चेंडूत १४४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १८ षटकार आणि ६ चौकारांसह धावांची आतिषबाजी केली. एका टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील डावात सर्वाधिक १८ षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला खातेही उघडले नाही. पण दुसऱ्या सामन्यात गोलंदाजांवर भारी पडत त्याने थेट विश्वविक्रम केला. १३व्या षटकातच त्यांच्या संघाने १९४ धावा केल्या आणि सायप्रसविरुद्धचा सामना ६ विकेटने जिंकला.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यातील एका डावात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
१८ – साहिल चौहान (इस्टोनिया)
१६ – हजरतुल्ला झाझई (अफगाणिस्तान)
१६ – फिन ऍलन (न्यूझीलंड)
१५ – झीशान कुकीखेल (हंगेरी)

हेही वाचा – T20 WC 2024: लॉकी फर्ग्युसनचे २४ चेंडू, ० धावा अन् ३ विकेट; अचंबित करणाऱ्या विक्रमाविषयी तुम्हाला माहितेय का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याआधी सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होता. त्याने ३१ चेंडूत शतक झळकावले. ख्रिस गेलने टी-२० मध्ये ३० चेंडूत शतक पूर्ण केले. व्यावसायिक क्रिकेटबद्दल बोलायचे तर हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या जॅक फ्रेजर मॅकगर्कच्या नावावर होता. गेल्या वर्षी तेथील देशांतर्गत स्पर्धेत त्याने २९ चेंडूत शतक झळकावले होते. पण आता साहिल चौहानने हे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.