सध्या आपल्या तुफान खेळीनं जगाचं लक्ष वेधून घेणारा पाकिस्तानचा क्रिकेटर बाबर आझम केवळ एक चांगला खेळाडूच नाही तर एक चांगला माणूस असल्याचंही दर्शन नुकतच घडलंय. बाबरने एका पाकिस्तानी महिला क्रिकेटरला सरावादरम्यान दुखापत झाल्यानंतर तिच्या उपचारासाठी आपल्या क्रिकेटच्या सामन्याचं मानधन देऊ केलंय. बाबरचे वडील आझम सिद्दिकी यांनी स्वतः याबाबत पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (PCB) याबाबत विनंती केली.

पाकिस्तानची महिला क्रिकेटर बिसमा अमजदला सरावादरम्यान डोक्याला मार लागला. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ती सिंध क्रिकेट अकॅडमीत सराव करत असताना ही घटना घडली. मागील ३ दिवसांपासून तिला सातत्यानं उलट्या होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी हे काळजीचं कारण असल्याचं सांगितलंय. तसेच उलट्या सुरूच राहिल्यास तिच्या पूर्ण शरीराचं स्कॅन करावं लागेल असं सांगितलंय.

बाबरच्या वडिलांकडून रमीझ राजा यांची भेट

दरम्यान, बाबर आझमच्या वडिलांनी पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ राजा यांची भेट घेत बाबरचं भारताविरुद्धच्या मॅचचं मानधन अमजदला देण्याची विनंती केलीय. तसेच अमजदची या उपचारादरम्यान पूर्ण काळजी घ्यावी अशी विनंती केलीय. त्यांनी इंस्टाग्रावर पोस्ट करत याबाबत माहिती दिलीय.

“पाकिस्तानचे सितारे अंगावर परिधान करणारा व्यक्ती असहाय असेल तर…”

या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, “मी पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांना राष्ट्रीय खेळाडू बिसमा अमजदच्या उपचाराची तातडीने सोय करावी अशी विनंती केलीय. पाकिस्तानचे सितारे असलेला गणवेश अंगावर परिधान करणारा व्यक्ती असहाय असेल तर तो देश असहाय आहे असा अर्थ निघतो.”

हेही वाचा : “हरभजनची माफी माग, संबंध नसताना…”, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूनं ‘त्या’ प्रकरणी मोहम्मद आमिरला खडसावलं!

पीसीबीने देखील बिसमा अमजच्या तब्येतीची माहिती देत ट्वीट केलंय. यात त्यांनी म्हटलं आहे, “पीसीबी एक जबाबदार संस्था म्हणून अमजदच्या उपचाराची आणि प्रकृतीची योग्य ती काळजी घेत आहे. उपचाराच्या खर्चाबाबतही पीसीबीने व्यवस्था केली आहे.”