इशांत चिंता करू नकोस, असे प्रत्येकाच्या बाबतीत घडते, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉल्कनरने भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या जखमेवर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी रात्री फॉल्कनरने इशांतच्या ४८व्या षटकात ३० धावांची बरसात करून विजयाचे पारडे भारताकडून ऑस्ट्रेलियाकडे झुकवले. फॉल्कनरने फक्त २९ चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांनिशी नाबाद ६४ धावांची सामना जिंकून देणारी खेळी साकारली.
सामन्यानंतर फॉल्कनरने इशांतचे सांत्वन केले. तो म्हणाला, ‘‘त्या परिस्थितीत गोलंदाजी करणे हे नेहमीच दडपणाचे असते, याची मला कल्पना आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा अनुभव मीसुद्धा बऱ्याचदा घेतला आहे. त्यामुळे चिंता करू नको. परंतु अनेकदा आपले षटक चांगले पडते आणि आपला संघ जिंकतो, हेच क्रिकेट असते.’’

Story img Loader