पीटीआय, दुबई

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या विजयी नाबाद शतकी खेळीनंतर माझा आवडता फटका असलेला कव्हर ड्राइव्ह अलीकडे माझ्या अपयशाला कारणीभूत ठरत होता, अशी कबुली दिली.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेल्या नाबाद शतकी खेळीतही कोहलीचे कव्हर ड्राइव्ह लक्षणीय ठरले होते. अलीकडच्या काळात हाच फटका माझ्या अपयशाचे कारण ठरत आहे. पण माझ्याकडे उपलब्ध असलेल्या फटक्यांमधील हा प्रमुख फटका होता. या फटक्यावर मी कारकीर्दीत अनेक धावा केल्या आहेत, असे कोहलीने म्हटले आहे.

‘‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील दिवस हा माझ्या फटक्यांचा होता. पहिल्या दोन चौकारांमध्ये कव्हर ड्राइव्हची झलक दिसली. पण वेळीच विचार करून मी आणखी थोडा धोका पत्करला आणि माझे ठेवणीतले काही फटके खेळलो. असे फटके खेळतो तेव्हा मला एक वेगळाच आत्मविश्वास मिळत असतो. माझ्यासाठी हा एक चांगला डाव आणि एक उत्तम सांघिक विजय होता,’’ असेही कोहलीने सांगितले.

पाकिस्तानविरुद्धचा सामना नेहमीच अन्य सामन्यांपेक्षा मोठा असतो. या सामन्यात खेळाडूंपेक्षा प्रेक्षकच अधिक जोडले गेलेले असतात. अशा सामन्यात पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देणारी खेळी करू शकलो याचा मला आनंद आहे. एकदिवसीय कारकीर्दीमधील चौदा हजार धावा आणि सर्वाधिक झेल झाल्याचे कळाल्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला, असेही कोहली म्हणाला.

दडपण हाताळण्यात कोहली सर्वोत्तम

अपयशाच्या गर्तेतून बाहेर पडताना पाकिस्तानविरुद्ध केलेल्या शतकी खेळीने विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी कोहलीच्या खेळपट्टीवरील उपस्थितीने डावाला स्थिरता मिळण्याचा विश्वास असतो, असे म्हटले आहे. ‘‘कोहलीने दडपणाखाली कायमच आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आहे. दडपण कसे हाताळायचे आणि संघासाठी कसे खेळायचे हे कोहलीने पाकिस्तानविरुद्ध पुन्हा एकदा दाखवून दिले,’’ असे ठाकूर यांनी म्हटले आहे. ‘‘विजयाचे लक्ष्य आणि शतकासाठी आवश्यक धावा यांचे समीकरण जुळवण्याचा कोहलीने कधीच प्रयत्न केला नाही. त्याने स्ट्राइक हलता ठेवत भारताच्या विजयालाच प्राधान्य दिले. शेवटपर्यंत टिकून राहण्यावर कोहलीचा भर होता. हेच कोहलीच्या खेळातील वैशिष्ट्य आहे,’’ असेही ठाकूर म्हणाले. इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष अरुण धुमल यांनी कोहलीचे कौतुक करतानाच ‘आयपीएल’ कसे महत्त्वपूर्ण ठरते यावर भाष्य केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Favorite shot was the reason for the failure virat kohli admits after century sports news amy