ज्याच्या नावावर २० ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत, त्या रॉजर फेडररलादेखील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या सुरक्षारक्षकांनी प्रवेशपत्र नसल्याने अडवले. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम सहा वेळा जिंकणाऱ्या फेडररला ‘नियम म्हणजे नियम’ हा खाक्या अनुभवावा लागला.
फेडररही त्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देता काही काळ थांबून राहिला. शनिवारी विश्रांतीच्या दिवशी फेडरर सरावासाठी निर्धारित कोर्टकडे जात असताना प्रवेशपत्र नसल्याने त्याला तेथील सुरक्षारक्षकांनी अडवले. अखेरीस त्याचे सहकारी आल्यानंतरच त्याचे प्रवेशपत्रासह त्याला सोडण्यात आले.
प्रत्येक तपासणीच्या ठिकाणी खेळाडूंनीदेखील त्यांचे प्रवेशपत्र दाखवण्याचा नियम प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. त्यामुळेच फेडररला थांबवल्यावर त्यानेदेखील नियमाला मुरड घालण्याचा प्रयत्न केला नाही. त्यातूनच फेडररचे महान खेळाडूबरोबरच महान माणूसपण अधोरेखित झाले.
‘विरुष्का’ची ‘फेडेक्स’ भेट!
कसोटीपाठोपाठ एकदिवसीय मालिकादेखील जिंकल्याने अत्यानंदात असलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासह ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत प्रेक्षक म्हणून हजेरी लावत टेनिसचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी त्याने नोव्हाक जोकोव्हिच आणि डेनिस श्ॉपोव्हॅलोव यांचा तसेच सेरेना विल्यम्स व डायना यासत्रेमस्का यांच्यातील सामने पाहिले. तसेच कोहलीने त्याचा आवडता खेळाडू रॉजर फेडररला भेटून त्याच्यासमवेत एक छायाचित्र ‘ट्वीट’ केले आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील हे छायाचित्र आयोजकांकडून टाकण्यात आले असून त्याखाली ‘एका छायाचित्रात तीन महान व्यक्ती’ असे नमूद केले आहे.