ब्रिस्बेन टेनिस स्पर्धेसह नवीन हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. महिला टेनिसमधील अव्वल दहापैकी सहा खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार आहेत, मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे रॉजर फेडरर. फेडरर यंदा या स्पर्धेत पदार्पण करणार आहे. दिग्गज खेळाडू स्टीफन एडबर्ग यांना प्रशिक्षक म्हणून आपल्या चमूत सामील करून घेतल्यानंतरची फेडररची ही पहिलीच स्पर्धा असणार आहे. १७ ग्रँडस्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या फेडररसाठी २०१३ हे वर्ष निराशादायी ठरले. मात्र नवीन हंगामात दमदार सलामीसाठी तो उत्सुक आहे. ३२ वर्षीय फेडररची जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत अँडी मरेने त्याला नमवले होते तर फ्रेंच खुल्या स्पर्धेत जो विल्फ्रेड त्सोंगाने त्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आणले. लाडक्या विम्बल्डन स्पर्धेत त्याला दुसऱ्याच फेरीत अनपेक्षित गाशा गुंडाळावा लागला. क्रमवारीत ११६व्या स्थानी असलेल्या सर्जी स्टॅखोव्हस्कीने त्याला नमवले होते. अमेरिकन खुल्या स्पर्धेत स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोने चौथ्या फेरीत त्याला पराभूत केले होते. मात्र स्पर्धात्मक टेनिस खेळण्याची ऊर्मी अजूनही संपलेली नाही. नव्या मोसमात दिमाखदार खेळ करायचा आहे, असे उद्गार फेडररनेच काढले होते. ब्रिस्बेन स्पर्धेत जपानचा उदयोन्मुख आणि जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेला केई निशिकोरी आणि फ्रान्सचा जिइल्स सिमोन फेडररपुढचे आव्हान असणार आहेत.
महिलांमध्ये गतविजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली सेरेना विल्यम्स जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेली व्हिक्टोरिया अझारेन्का, मारिया शारापोव्हा, जेलेना जॅन्कोव्हिच, अँजेलिक्यू कर्बर आणि कॅरोलिन वोझ्नियाकी सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा