अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत शनिवारी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. नोव्हाक जोकोव्हिच, रॉजर फेडरर या महान खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढत केई निशीकोरी आणि मारिन चिलिच या नव्या दमाच्या टेनिसपटूंनी दिमाखात अंतिम फेरी गाठली आहे. २००५नंतर प्रथमच जोकोव्हिच, फेडरर आणि राफेल नदाल या त्रिकुटांपैकी एकही जण अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा निशीकोरी हा पहिला आशियाई टेनिसपटू ठरला आहे.
जपानच्या १०व्या मानांकित निशीकोरीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आणि सात ग्रँड स्लॅम जेतेपदांना गवसणी घालणाऱ्या जोकोव्हिचचे आव्हान ६-४, १-६, ७-६ (७/४), ६-३ असे चार सेटमध्ये परतवून लावले. ‘‘ग्रँड स्लॅम स्पर्धेतील माझा पहिलाच उपांत्य फेरीचा मुकाबला असल्यामुळे मी फारच उत्सुक होतो. अव्वल क्रमांकाच्या खेळाडूला हरवल्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे,’’ असे ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात रंगलेल्या या सामन्यात जोकोव्हिचचा पराभव केल्यानंतर निशीकोरीने सांगितले. १८ पैकी १७ ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या जोकोव्हिचने सांगितले की, ‘‘निशीकोरी फारच छान खेळला. त्याच्या मेहनतीला आणि कामगिरीला मी मनापासून दाद देतो. तो चांगला टेनिसपटू होईल, अशी आशा आहे.’’
अमेरिकन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा निशीकोरी हा १९१८ नंतरचा जपानचा पहिला खेळाडू ठरला होता. त्याला आता सोमवारी होणाऱ्या महामुकाबल्यात क्रोएशियाच्या १४व्या मानांकित मारिन चिलिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. चिलिचने अमेरिकन स्पर्धेची पाच जेतेपदे पटकावणाऱ्या फेडररचा ६-३, ६-४, ६-४ असा सहज धुव्वा उडवला.
पाच सेटपर्यंत रंगलेल्या मागील दोन सामन्यांत विजय मिळवणाऱ्या निशीकोरीने उपांत्य फेरीत मात्र जोकोव्हिचविरुद्ध शानदार कामगिरी करताना ३९ मिनिटांतच पहिला सेट जिंकला. त्यानंतर जोकोव्हिचने चौथ्या आणि सहाव्या गेममध्ये निशीकोरीची सव्‍‌र्हिस मोडीत काढत दुसरा सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली. निशीकोरीने तिसऱ्या गेममध्ये चार ब्रेकपॉइंट वाचवून निशीकोरीने तिसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. पण ट्रायब्रेकरमध्ये त्याला हा सेट जिंकता आला. पहिल्या आणि नवव्या गेममध्ये जोकोव्हिचची सव्‍‌र्हिस भेदून निशीकोरीने चौथा सेट जिंकून कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा