कॅनडातील रॉजर्स चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्वित्र्झलडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याला पराभूत व्हावे लागले तरी यापुढे त्याने हार्डकोर्टवर अधिकाधिक यश मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेडररचे अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे.
गेल्या आठवडय़ात ३३व्या वर्षांत पदार्पण करणारा फेडरर म्हणाला, ‘‘अंतिम फेरीत जो-विल्फ्रेड त्सोंगाकडून पराभूत झाल्यामुळे मी निराश झालो असलो तरी हार्डकोर्टवर स्पर्धा जिंकण्याची क्षमता माझ्यात नक्कीच आहे.’’ या मोसमात सात वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या फेडररला तीन वेळा जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. आता अमेरिकन खुल्या आणि सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेसाठी तो सज्ज होत आहे.
‘‘हार्डकोर्टवर परतल्यानंतर पहिल्याच स्पर्धेत अंतिम फेरी गाठल्यामुळे मी आनंदी आहे. अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात अनेक बलाढय़ प्रतिस्पध्र्याचा पाडाव केल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र मला पुढील काही आठवडे कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. मी माझ्या क्षमतेनुसार खेळ केला तर अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची संधी मला आहे,’’ असेही त्याने सांगितले. सिनसिनाटी स्पर्धेत फेडररला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना कॅनडाचा वसेक पोस्पिसिल आणि झेक प्रजासत्ताकचा राडेक स्टेपानेक यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

Story img Loader