रॉजर फेडरर आणि सेरेना विल्यम्स या दिग्गजांनी सिनसिनाटी टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासह अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. फेडररने डेव्हिड फेररवर ६-३, १-६, ६-२ अशी मात करत सिनसिनाटी स्पर्धेच्या सहाव्या जेतेपदाची कमाई केली. या विजयासह फेडररने फेररविरुद्ध १६-० अशी निर्विवाद विजयाची परंपरा कायम राखली. अंतिम लढतीत पहिला सेट सहजपणे जिंकत फेडररने आश्वासक सुरुवात केली मात्र दुसऱ्या सेटमध्ये फेररने झुंजार खेळ करत पुनरागमन केले. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये फेडररने आपला खेळ उंचावत बाजी मारली.  सलग चार एटीपी मास्टर्स स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर फेडररने जेतेपदावर नाव कोरले. काही दिवसांपूर्वी टोरंटो येथे झालेल्या स्पर्धेत जो विल्फ्रेंड त्सोंगाने त्याला नमवले होते.
महिलांमध्ये अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने आपला दबदबा कायम राखला. काही दिवसांतच सुरू होणाऱ्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदासाठी सेरेना प्रबळ दावेदार आहे. वर्षांतील शेवटच्या आणि घरच्या मैदानावर होणाऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी तय्यार असल्याचे सेरेनाने सप्रमाण सिद्ध केले. मारिया शारापोव्हाला पराभवाचा धक्का देणाऱ्या अ‍ॅना इव्हानोव्हिकवर सेरेनाने ६-४, ६-१ असा विजय मिळवला. १२ बिनतोड सव्‍‌र्हिससह सेरेनाने संपूर्ण सामन्यात अ‍ॅनावर वर्चस्व गाजवले.

Story img Loader