वयाच्या ३३व्या वर्षीही तरुणांना लाजवणारी ऊर्जा घेऊन मैदानात उतरलेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फेडररने फ्रान्सच्या गाइल्स सिमॉनचा ६-३, ७-५, ६-२ असा पराभव केला. या विजयाबरोबर त्याने दहाव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कारकीर्दीतील ३७व्या ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत फेडररसमोर ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेचे आव्हान असेल. सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनेही क्रोएशियाच्या मरिन सिलिक याचे आव्हान संपुष्टात आणले. जोकोव्हिचने एक तास ४९ मिनिटांच्या लढतीत ६-४, ६-४, ६-४ अशी बाजी मारली.
फेडरर आणि सिमॉन यांच्यातील लढतीत दोन वेळा पावसाने व्यत्यय आणला. मात्र, सामन्यावरील पकड न गमावता फेडररने १ तास ३५ मिनिटांत सिमॉनला पराभूत केले. फेडररने सिमॉनविरुद्ध गेल्या आठ लढतींमधील सहाव्या विजयाची नोंद केली. सिमॉन पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक होता. मात्र, फेडररचे आव्हान त्याला पार करता आले नाही.
उपांत्य फेरीत त्याच्यासमोर २०१३चा विजेता मरेचे आव्हान आहे. मरेने कॅनडाच्या व्ॉसेक पॉस्पीसीलचा ६-४, ७-५, ६-४ असा सहज पराभव केला. मरेने दोन तास १२ मिनिटांच्या संघर्षांत हा विजय साजरा केला. फेडरर आणि मरे यांच्यात यापूर्वी २०१२ विम्बल्डन स्पध्रेच्या अंतिम फेरीत लढत झाली
होती आणि त्यात फेडररने बाजी मारली होती. मात्र, अवघ्या काही आठवडय़ांत झालेल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या लढतीत मरेने त्याचा वचपा काढला होता.
‘‘आम्हा दोघांना २०१२च्या सत्रात डोकावून पाहण्याची संधी मिळाली आहे. मी त्या वेळी विम्बल्डन जिंकले होते, तर त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही मैदानात उतरणार आहोत,’’ असे फेडरर म्हणाला.

पावसाच्या लपंडावात खेळणे नेहमीच अवघड जाते, परंतु मी या परिस्थितीचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेतला. त्याचा अडथळा मला जाणवत नव्हता, तर मला मदतच होत होती.
– रॉजर फेडरर

ब्रायन बंधूंना भारतीय हिसका
पुरुष दुहेरीत कोणत्याही प्रतिस्पध्र्याना धसका भरवणाऱ्या अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन बंधूंना विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. भारताचा रोहन बोपन्ना आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्गीआ या जोडीने अव्वल मानांकित ब्रायन बंधूंना बाहेरचा रस्ता दाखवला.
पहिल्या सेटमध्ये पराभव पत्करल्यानंतर बोपन्ना-मर्गीआ जोडीने दमदार पुनरागमन केले आणि ही लढत ५-७, ६-४, ७-६ (११-९), ७-६ (७-५)अशा फरकाने जिंकून धक्कादायक निकाल नोंदवला. २ तास ३५ मिनिटांनंतर मिळवलेल्या विजयासह बोपन्ना-मर्गीआने उपांत्य फेरीत ऐटीत प्रवेश केला. बोपन्ना-मर्गीआने ३१ विनर लगावले, त्यातील १७ एस होते आणि त्याने पाचपैकी तीन ब्रेक पॉइंट वाचवले. उपांत्य फेरीत या जोडीला चौथ्या मानांकित जीन ज्युलियन रॉजर आणि होरिआ टेकाऊ यांचा सामना करावा लागणार आहे. रॉजर-टेकाऊने उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित मॅर्सिन मॅटकोव्स्की आणि नेनाद जिमोंजिक यांच्यावर ६-४, ६-३, ७-६ (७-२) असा विजय साजरा केला.
दरम्यान मिश्र दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झाने ब्राझिलियन जोडीदार ब्रुनो सोआरेससह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या मानांकित जोडीने मॅरिन ड्रॅगांजा आणि अ‍ॅना कोजुंह या क्रोएशियन जोडीचा ६-३, ७-६ (७-५), ६-३ असा पराभव केला. कनिष्ठ गटात प्रांजला यादलपल्लीच्या पराभवासह भारताचे आव्हान संपुष्टात आले. तिला अमेरिकेच्या मिचेला गॉर्डनकडून २-६, ३-६ असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. मुले दुहेरीत सुमित नागल आणि त्याचा व्हिएतनामचा जोडीदार नाम होआंग ली यांनी अ‍ॅलेक्स डे मिनाउर आणि योसुके व्ॉटानुकी या ऑस्ट्रेलियन-जपानच्या जोडीवर ६-४, ७-५ असा विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Story img Loader