वयाच्या ३३व्या वर्षीही तरुणांना लाजवणारी ऊर्जा घेऊन मैदानात उतरलेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या जेतेपदाच्या शर्यतीत स्वत:ला कायम राखले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फेडररने फ्रान्सच्या गाइल्स सिमॉनचा ६-३, ७-५, ६-२ असा पराभव केला. या विजयाबरोबर त्याने दहाव्यांदा विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कारकीर्दीतील ३७व्या ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत फेडररसमोर ब्रिटनच्या अॅण्डी मरेचे आव्हान असेल. सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनेही क्रोएशियाच्या मरिन सिलिक याचे आव्हान संपुष्टात आणले. जोकोव्हिचने एक तास ४९ मिनिटांच्या लढतीत ६-४, ६-४, ६-४ अशी बाजी मारली.
फेडरर आणि सिमॉन यांच्यातील लढतीत दोन वेळा पावसाने व्यत्यय आणला. मात्र, सामन्यावरील पकड न गमावता फेडररने १ तास ३५ मिनिटांत सिमॉनला पराभूत केले. फेडररने सिमॉनविरुद्ध गेल्या आठ लढतींमधील सहाव्या विजयाची नोंद केली. सिमॉन पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक होता. मात्र, फेडररचे आव्हान त्याला पार करता आले नाही.
उपांत्य फेरीत त्याच्यासमोर २०१३चा विजेता मरेचे आव्हान आहे. मरेने कॅनडाच्या व्ॉसेक पॉस्पीसीलचा ६-४, ७-५, ६-४ असा सहज पराभव केला. मरेने दोन तास १२ मिनिटांच्या संघर्षांत हा विजय साजरा केला. फेडरर आणि मरे यांच्यात यापूर्वी २०१२ विम्बल्डन स्पध्रेच्या अंतिम फेरीत लढत झाली
होती आणि त्यात फेडररने बाजी मारली होती. मात्र, अवघ्या काही आठवडय़ांत झालेल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या लढतीत मरेने त्याचा वचपा काढला होता.
‘‘आम्हा दोघांना २०१२च्या सत्रात डोकावून पाहण्याची संधी मिळाली आहे. मी त्या वेळी विम्बल्डन जिंकले होते, तर त्याने ऑलिम्पिक सुवर्णपदक. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही मैदानात उतरणार आहोत,’’ असे फेडरर म्हणाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा