पुनरावृत्ती हा जीवनाचा स्थायीभाव. विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतसुद्धा गतवर्षीचीच पुनरावृत्ती पाहायला मिळणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आणि अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने लौकिक तसेच आकडेवारीला साजेसा खेळ करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याला जेतेपदासाठी १८व्या विक्रमी ग्रँड स्लॅमसाठी आतूर असलेल्या रॉजर फेडररचे आव्हान असेल. गेल्या वर्षी जोकोव्हिचने फेडररला हरवून विजेतेपद पटकावले होते, तर २०१३मध्ये ब्रिटनच्या अँडी मरेने पराभूत केल्यामुळे जोकोव्हिचला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
रिचर्ड गॅस्क्वेटविरुद्धची कामगिरी १३-१ अशी सुधारत जोकोव्हिचने जेतेपदाच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले. जोकोव्हिचने ही लढत ७-६, ६-४, ६-४ अशी सरळ सेट्समध्ये जिंकत आपले प्रभुत्व सिद्ध केले. खांद्याच्या दुखापतीला शरण न जाता चिवटपणे खेळ करत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील जोकोव्हिचने हा विजय साकारला. सेंटर कोर्टवर दोन तास आणि २० मिनिटांमध्ये जोकोव्हिचने उपांत्य लढत जिंकून चौथ्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. २८ वर्षीय जोकोव्हिच आपल्या कारकीर्दीतील तिसऱ्या विम्बल्डन जेतेपदासाठी उत्सुक आहे.
‘‘मी स्वप्नवत वाटचाल करतो आहे. विम्बल्डन या टेनिस विश्वातल्या सर्वोत्तम टेनिस कोर्टवर खेळण्याची मला संधी मिळते आहे. त्यामुळे सर्वोत्तम प्रदर्शन करणे माझे कर्तव्य आहे. अंतिम लढत खडतर असेल पण मी खेळाचा आनंद घेत जिंकण्याचा प्रयत्न करेन,’’ असे जोकोव्हिचने सांगितले. विम्बल्डनचे तिसरे तर कारकीर्दीतील आठव्या व वर्षांतील दुसऱ्या ग्रँड स्लॅम जेतेपदापासून जोकोव्हिच केवळ एक विजय दूर आहे.
दुसऱ्या उपांत्य लढतीत ३३ वर्षीय फेडररने ब्रिटनच्या अँडी मरेचा अडथळा ७-५, ७-५, ६-४ असा पार केला. पहिल्या दोन सेटमध्ये मरेने फेडररला कडवी झुंज दिली. परंतु शेवटच्या सेटमध्ये फेडररने आरामात वर्चस्व गाजवले. केन रॉसवेल (१९७४) विम्बलडनची अंतिम फेरी गाठणारा तो सर्वात वयेशीर खेळाडू ठरला आहे.
‘‘मला अविश्वसनीय आनंद झाला आहे. टेनिसरसिकांनी हा सामना चार किंवा पाच सेटपर्यंत चालेल अशी अपेक्षा केली होती. मलाही तसे वाटले होते,’’ असे फेडररने सामन्यानंतर सांगितले.

Story img Loader