वयाची तिशी गाठलेल्या, जेतेपदांच्या शर्यतीपासून दूर झालेल्या रॉजर फेडररची जागतिक क्रमवारीत घसरण झाली आहे. विम्बल्डन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागलेला फेडरर क्रमवारीत पाचव्या स्थानी फेकला गेला आहे. गेली अनेक वर्षे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे आणि क्रमवारीतील अव्वल स्थान या संदर्भात फेडररचे नाते अतूट होते. मात्र वाढत्या वयाबरोबर हालचाली मंदावलेला, पाठीच्या दुखण्याने त्रस्त फेडररला जेतेपद मिळवणे कठीण होऊ लागले आहे. याचा स्पष्ट परिणाम फेडररच्या क्रमवारीतील घसरणीवर दिसून आला आहे.
दरम्यान, विम्बल्डनच्या अंतिम लढतीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने क्रमवारीत मात्र अढळ स्थान कायम राखले आहे. तब्बल ७७ वर्षांनंतर विम्बल्डनला इंग्लिश विजेता मिळवून देणाऱ्या अँडी मरेने क्रमवारीतील दुसरे स्थान टिकवले आहे. फ्रेंच खुली स्पर्धा आणि विम्बल्डन स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या डेव्हिड फेडररने क्रमवारीत तिसरे आणि कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थानी झेप घेतली आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विक्रमी आठवे जेतेपद नावावर करणारा, मात्र विम्बल्डन स्पर्धेत सलामीच्या लढतीतच गारद झालेला राफेल नदाल क्रमवारीत चौथ्या स्थानी स्थिरावला आहे.
कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या मारियन बाटरेलीने क्रमवारीत १५व्या स्थानावरून ७व्या स्थानी आगेकूच केली आहे. मात्र जेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या मात्र चौथ्याच फेरीत गारद झालेल्या सेरेना विल्यम्सने क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे.