जागतिक क्रमवारीत नोव्हाक जोकोव्हिच अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर रॉजर फेडरर दुसऱ्या स्थानावर आहे. जोकोव्हिच अव्वल मानांकित, तर फेडरर द्वितीय. कलात्मकतेचे प्रतीक म्हणजे फेडरर, तर यांत्रिक व्यावसायिकता बाणवलेला जोकोव्हिच. या दोघांच्या मुकाबल्यादरम्यान पाठिंबा कोणाला द्यावा, असा पेच टेनिसरसिकांना पडतो. मेंदू जोकोव्हिचला साथ देतो, तर मनाला फेडररची आस असते. कट्टर मतलबी जगातही दर्दी टेनिस चाहत्यांसमोर असा पेच मांडणाऱ्या फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यामध्येच विम्बल्डनच्या अढळपदासाठी मुकाबला रंगणार आहे.
अडीच वर्षांचा गँड्र स्लॅम जेतेपदांचा दुष्काळ संपवत विक्रमी १८वे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद पटकावण्यासाठी फेडरर आतुर आहे. दुसरीकडे ग्रँड स्लॅम जेतेपदांमधले खंडित झालेले सातत्य परत मिळविण्यासाठी जोकोव्हिच तयार आहे. इंग्लंडच्या अँडी मरेचा सरळ सेट्समध्ये धुव्वा उडवत फेडररने अंतिम फेरी गाठली आहे, तर रिचर्ड गॅस्क्वेटचे आव्हान सहज संपुष्टात आणत जोकोव्हिचने अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत अपराजित राहण्याचा विक्रम कायम करत फेडरर १०व्यांदा अंतिम लढत खेळतोय. कारकीर्दीतली फेडररची ग्रँड स्लॅम स्पर्धेची २६वी अंतिम लढत असेल. विम्बल्डनच्या आठव्या जेतेपदासाठी फेडरर, तर तिसऱ्या विजेतेपदासाठी जोकोव्हिच उत्सुक आहे.