गुणवत्ता प्रत्येकामध्ये असते, पण दैवी देणगी ही मोजक्याच जणांच्या वाटय़ाला आलेली असते. कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर शून्यातून आपले विश्व कसे निर्माण करायचे, याची उपजत कला त्यांच्यात असते. आपल्या परीसस्पर्शाने ते त्या क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. म्हणूनच महान व्यक्तींच्या मांदियाळीत त्यांची गणना केली जाते. फुटबॉलमधील सर अॅलेक्स फग्र्युसन हे त्यापैकीच एक. अॅडॉल्फ हिटलरने आपल्या सामर्थ्यांच्या जोरावर जग जिंकण्याचे धाडस केले. त्याच ईष्र्येने आपल्यातील अफाट गुणवत्तेच्या जोरावर फुटबॉलविश्व जिंकण्याचा फग्र्युसन यांचा मानस होता. क्लब स्तरावरच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धाची जेतेपदे मिळवणारे फग्र्युसन हे महान प्रशिक्षक आहेत.
मँचेस्टर युनायटेडने १३८ वर्षांच्या आपल्या इतिहासात अनेक दिग्गज फुटबॉलपटू घडवले. पण फग्र्युसनसारखा महान प्रशिक्षक त्यांना लाभला, हे त्यांचे भाग्यच. खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसतो, असे म्हटले जाते. फुटबॉलमध्ये कोणताही खेळाडू हा क्लबपेक्षा मोठा नसतो, असा काही क्लब्सचा दावा असतो. पण खेळाडू हा प्रशिक्षकापेक्षा मोठा नसतो, हे फग्र्युसन यांनी आपल्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत दाखवून दिले. तीव्र इच्छाशक्ती, सर्वोत्तम खेळाडू घडवण्याची आणि सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठीची त्यांची धडपड, त्यासाठी कितीही कष्ट घेण्याची वृत्ती, व्यावसायिकपणा, शिस्त, रागीटपणा या सर्वाच्या जोरावर फग्र्युसन यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. शिखरावर पोहोचण्याच्या मार्गात अडसर बनणाऱ्यांची त्यांनी हयगय केली नाही. म्हणूनच प्रशिक्षकपदाच्या दुसऱ्या कामात सेंट मिरेन क्लबच्या अध्यक्षांशी खटके उडाल्यानंतर फग्र्युसन यांची हकालपट्टी करण्यात आली.
सुदैवाने १९८६मध्ये मँचेस्टर युनायटेडसारख्या क्लबच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळण्याची संधी त्यांना मिळाली. त्या वेळी युनायटेड फारसा श्रीमंत नव्हता. (युनायटेडचा संपूर्ण वर्षभराचा खर्च ३ दशलक्ष युरो इतका होता. आता संघातील किमान १२ खेळाडूंची वर्षभराची कमाई ३ दशलक्ष युरोपेक्षा जास्त आहे.) करार संपल्यानंतरही खेळाडू संघ सोडायला तयार नसायचे. फुटबॉल संघ घडवण्याऐवजी फुटबॉल क्लब तयार करण्याचे स्वप्न त्यांनी जोपासले. सुरुवातीला खेळाडूंच्या मद्यसेवनाची समस्या त्यांना चांगलीच भेडसावत होती. पण खेळाडूंना तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून त्यांनी खेळाडूंना शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच वर्षभराच्या कालावधीत त्यांनी युनायटेडला २१व्या स्थानावरून ११व्या क्रमांकावर आणून ठेवले.
सर्व खेळाडूंवर फग्र्युसन यांचा दबदबा होता. प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच असतो आणि तो जिंकलाच पाहिजे, ही फग्र्युसन यांची धारणा होती. म्हणूनच विम्बल्डनमधील एका दुबळ्या क्लबकडून युनायटेडला पराभूत व्हावे लागले आणि संतप्त फग्र्युसन यांनी ड्रेसिंग रूममधील वस्तूंवर राग काढण्यास सुरुवात केली. त्यांनी भिरकावलेली एक वस्तू एका खेळाडूच्या डोक्यावर जाऊन आदळली. असह्य वेदना होत असतानाही तो जागीच खाली बसला. जागेवरून हलण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. सामना गमावल्यानंतर फग्र्युसन आपल्या खेळाडूंना ‘हेअरड्रायर ट्रीटमेंट’ देत असत. पण त्याबाबत वाच्यता करण्याचे धारिष्टय़ कुणातही नव्हते. ‘रागीट फग्र्युसन’ ही त्यांची प्रतिमा खेळाडूंच्या मनात निर्माण झाली होती. याच भीतीमुळे खेळाडूंची पाचावर धारण बसायची आणि त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी व्हायची, असे बेकहॅमसुद्धा मान्य करतो.
डेव्हिड बेकहॅम हा फुटबॉलमधील सर्वोत्तम स्ट्रायकर आहे तो दैवी देणगीमुळे नाही तर त्याने केलेल्या शिस्तबद्ध सरावामुळे, हे फग्र्युसन यांचे विचार त्यांच्या कडक शिस्तीचे महत्त्व सांगून जातात. फग्र्युसन यांनी संघात चांगल्या खेळाडूंना नव्हे तर क्लबसाठी सर्वस्व वाहून घेणाऱ्या खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे गॅरी नेविले, रिओ फर्डिनांड, डेनिस इर्विन, पॉल स्कोल्स, रॉय केन, ख्रिस्तियानो रोनाल्डो, रायन गिग्ज, रुड व्हॅन निस्टलरॉयसारखे खेळाडू त्यांनी घडवले.
फग्र्युसन यांचे वादविवादांशी सख्य होते. त्यामुळे अनेक प्रकरणांत ते गोत्यात आले. रागीट स्वभाव असूनही खेळाडूंशी ते पालक या नात्यानेच वागायचे. प्रत्येक खेळाडूविषयी करुणभाव असणाऱ्या फग्र्युसन यांना खेळाडूंची इत्थंभूत माहिती असायची. खेळाडूंनी कधीही त्यांना अपशब्द वापरला नाही. ‘‘तो माझा मुलगा असल्यामुळे मी त्याला वाईट सल्ला देणार नाही,’’ हे ख्रिस्तियानो रोनाल्डो २००८मध्ये युनायटेड सोडून जातानाचे फग्र्युसन यांचे उद्गार खेळाडूंविषयी किती प्रेम आहे, हे सांगून जातात.
४५व्या वर्षी प्रशिक्षकपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या फग्र्युसन यांनी वयाच्या ७१व्या वर्षी निवृत्त होताना युनायटेडला यशोशिखरावर नेऊन ठेवले. १३ इंग्लिश प्रीमिअर लीग जेतेपदे, १० कम्युनिटी शिल्ड, ५ एफए चषक जेतेपदे, ४ लीग चषक जेतेपदे आणि दोन वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद ही फग्र्युसन यांच्या महानतेची साक्ष देतात. सर्वोत्तम खेळाडू, संघ, क्लब निर्माण करणे हे त्यांचे ध्येय असले तरी त्यांनी जगभरातल्या चाहत्यांना वर्षांनुवर्षे थरारक, उत्कंठावर्धक सामन्यांची मेजवानी दिली. युनायटेडचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या फग्र्युसन पर्वाचा अस्त रविवारी मँचेस्टर युनायटेडच्या या मोसमातील अखेरच्या सामन्यानंतर होईल, पण त्यांची उणीव जगभरातील चाहत्यांना कायम सलत राहील.
tushar.vaity@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा