आयसीसी क्रिकेट समितीत खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून टीम मे यांच्या जागी भारताच्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या महासंघाने आयसीसीने या प्रकरणी शिस्तपालन समितीद्वारे चौकशी करावी अशी मागणी केली आहे. बीसीसीआयचा पाठिंबा असलेले शिवरामकृष्णन यांना मतदान करण्यासाठी कर्णधारांवर दबाबही आणला गेला असल्याचा आरोपही या संघटनेने केला.
टीम मे आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या महासंघाचे मुख्य कार्यकारी अध्यक्षही आहेत. निवडणूक झाल्यानंतर बीसीसीआयच्या आग्रहामुळे पुनर्निवडणुका घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्यांदा घेण्यात आलेल्या निवडणुकीत मे यांनी ९-१ असा सहज विजय मिळवला होता. मात्र बीसीसीआयने आपल्या प्रभावी आर्थिक ताकदीच्या जोरावर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वे बोर्डाना शिवरामकृष्णन यांना मत देण्यास भाग पाडले असा आरोप बीसीसीआयवर होत आहे. गुप्त मतदानावेळी बोर्डावर दबाव टाकण्यात येऊ नये, अशी सूचना आयसीसीतर्फे देण्यात आलेली असतानाही त्यांच्यावर मत बदलण्यासाठी दडपण टाकण्यात आल्याचे खेळाडूंच्या महासंघाचे कायदेशीर सल्लागार इयान स्मिथ यांनी सांगितले.

Story img Loader