जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूसाठी दिल्या जाणाऱ्या बलॉन डी’ऑर पुरस्काराच्या शर्यतीत गतविजेत्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसमोर फिफा विश्वचषक विजेत्या जर्मनी संघातील सहा फुटबॉलपटूंचे आव्हान असणार आहे. रोनाल्डोला तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरण्यासाठी टोनी क्रूस, फिलिप लॅम, थॉमस म्युलर, मारिओ गत्झ, मॅन्युएल न्यूअर, बास्तियन श्वाइनस्टायगर या जर्मनीच्या सहा खेळाडूंचा पाडाव करावा लागणार आहे.
बलॉन डी’ऑर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या २३ जणांची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. यात रोनाल्डोसह त्याचा रिअल माद्रिदचा सहकारी गॅरेथ बॅले (वेल्स) आणि जेम्स रॉड्रिगेझ (कोलंबिया) यांचा समावेश आहे. ब्राझीलचा नेयमार, स्पेनचा आंद्रेस इनियेस्टा, अर्जेटिनाचे लिओनेल मेस्सी आणि जेवियर मॅस्चेरानो यांनी या यादीत स्थान मिळवले आहे. मेस्सीने तब्बल चार वेळा या पुरस्काराला गवसणी घातली असून रोनाल्डो तिसऱ्या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहे.
लिव्हरपूलतर्फे चांगली कामगिरी करून इंग्लिश प्रीमिअर लीगमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावणाऱ्या आणि बार्सिलोना संघात दाखल झालेल्या उरुग्वेच्या लुइस सुआरेझला मात्र या यादीत स्थान मिळाले नाही. फिफा विश्वचषकादरम्यान इटलीच्या जॉर्जियो चिएलिनीच्या खांद्यावर चावा घेतल्याचा फटका त्याला बसला. या यादीत ला लीगा, चॅम्पियन्स लीग आणि जर्मन बुंडेसलीगामध्ये चमक दाखवणाऱ्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले आहे. या तिन्ही स्पर्धा न खेळलेल्यांपैकी स्वीडनचा झ्लटान इब्राहिमोव्हिच, फ्रान्सचा पॉल पोगबा यांनी स्थान मिळवले आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमधील एकाही खेळाडू किंवा प्रशिक्षकाला या यादीत स्थान मिळाले नाही. सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्कारासाठी जर्मनीचे विश्वचषक विजेते प्रशिक्षक जोकिम लो आणि इटलीचे प्रशिक्षक कालरे अँकलोट्टी यांच्यात चुरस आहे. तीन जणांची सुधारित यादी १ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार असून विजेत्याची घोषणा १२ जानेवारी रोजी झ्युरिक येथे होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान केली जाईल.

Story img Loader