विश्वचषक स्पर्धेतील सामने आयोजित करण्यासाठी  कूपरेज मैदान चांगले आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे स्पर्धा संचालक इनाकी अल्वारेझ यांनी कूपरेज मैदानाविषयी प्रशंसोद्गार काढले.
भारतात २०१७ मध्ये १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी विविध ठिकाणांची निश्चिती करण्यापूर्वी पाहणी करण्यासाठी अल्वारेझ यांच्यासह फिफाचे तीन सदस्य आले आहेत. स्पर्धा व्यवस्थापक विजय पार्थसारथी यांच्या समवेत अल्वारेझ यांनी कूपरेज मैदानाची पाहणी केली.
या पाहणीनंतर ते म्हणाले,‘‘आम्ही पुण्यातील शिवछत्रपती स्टेडियम व नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमचीही पाहणी केली आहे. ही स्टेडियम्सही चांगली आहेत. कोणती स्टेडियम्स निवडायची हे फिफाची प्रशासकिय समिती ठरविणार आहे. आम्ही फक्त पाहणी करून अहवाल पाठविणार आहोत. त्यामुळे आताच याबाबत सांगणे उचित ठरणार नाही.’’
या समितीने विद्यापीठ क्रीडा संकुल व मुंबई जिमखाना येथील मैदानांचीही पाहणी केली. ही मैदाने सरावासाठी वापरली जाणार आहेत.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्री मेनेझिझ यांनी सांगितले, की महाराष्ट्रात विश्वचषकाचे सामने आयोजित करण्यासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य लाभणार आहे. खेळाडू व पदाधिकाऱ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था, व्हिसा मंजुरी आदींबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे. फिफाचे शिष्टमंडळ गुवाहाटी, कोलकाता व नवी दिल्ली येथील स्टेडियम्सचीही पाहणी करणार आहे.