युवा खेळाडूंचा समावेश असलेला, सळसळत्या रक्ताचा फ्रान्सचा संघ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. फ्रान्सला विश्वचषकातील पहिले आव्हान असेल होंडुरासचे. या दोन्ही संघांमध्ये विश्वचषकात एकही सामना झालेला नसून ते पहिल्यांदाच भिडणार आहेत.
१९९८मध्ये फ्रान्सने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती, पण त्यानंतर मात्र त्यांना नेत्रदीपक कामगिरी करता आलेली नाही. सध्याच्या फ्रान्सच्या संघात युवा खेळाडूंचा भरणा असला तरी त्यांना फ्रँक रिबेरीची उणीव नक्कीच जाणवेल. पाठीच्या दुखण्यामुळे फ्रँकला विश्वचषकाला मुकावे लागले असून त्याची जागा कोण घेणार हा प्रश्न फ्रान्सपुढे असेल. गिरॉड आणि अँटोनी ग्रिझमन यांच्या कामगिरीकडे यावेळी साऱ्यांचेच लक्ष असेल.
गेल्या काही सामन्यांमध्ये होंडुरासचा संघ फॉर्मात नसल्याचे साऱ्यांनीच पाहिले आहे. त्याचबरोबरी संघातील काही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्यांच्यासाठी फ्रान्सविरुद्धचा सामना खडतर असेल.