भ्रष्टाचार आणि अनेक गैरव्यवहारांच्या पाश्र्वभूमीनंतरही २०१८ साली रशियामध्ये आणि २०२२ साली कतारमध्ये फिफा विश्वचषकाचे संयोजन करण्यास आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) हिरवा कंदील दाखवला आहे. संयोजनाचे हक्क मिळवण्यासाठी भ्रष्टाचार तसेच गैरव्यवहार झाल्यामुळे संयोजकपदासाठी पुन्हा मतचाचणी घेण्यात यावी, ही मागणीही फिफाने फेटाळून लावली.
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी योग्य पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत, असे फिफाच्या नैतिक समितीने सांगत ही मागणी फेटाळून लावली आहे. २०१८ आणि २०२२च्या यजमानपदासाठी झालेल्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अमेरिकेचे माजी न्यायाधीश मायकेल गार्सिया यांच्या अध्यक्षतेखालील समिती फिफाने नियुक्त केली होती. या समितीने एक वर्षांच्या तपासानंतर ५ सप्टेंबर रोजी फिफाकडे ३५० पानी अहवाल सादर केला होता. कतारमध्ये उन्हाळ्यातील वातावरण ४० सेल्सियसपेक्षा जास्त असल्यामुळे या देशाला संयोजनपदाचे हक्क कसे देण्यात आले, यावरून बराच वादंग उठला होता. मात्र सध्या फिफाच्या नैतिक समितीने पुढील दोन विश्वचषकांच्या संयोजनाला हिरवा कंदील दाखवला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा