२०१८च्या फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनाची जबाबदारी रशियाला तर २०२२च्या विश्वचषकाचे यजमानपद कतारला दिल्याप्रकरणी झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी फिफाचे चौकशी प्रमुख मायकेल गार्सिआ ब्राझील येथील विश्वचषकानंतर आपला अहवाल सादर करणार आहेत. गार्सिआ यांच्या नेतृत्वाखालील चमू दोन वर्षांचा तपास पूर्ण करणार असून, या तपासासाठी विश्वचषकाच्या यजमानपदाच्या बोली प्रक्रियेसंदर्भात असंख्य व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.
‘‘विश्वचषकाची बोली मिळण्याशी संबंधित साक्षीदार, संबंधित व्यक्ती यांची चौकशी करून आम्ही ९ जून २०१४ रोजी तपास पूर्ण केला आहे. याविषयीचा अहवाल सहा आठवडय़ांनंतर लवादाला सादर करणार आहोत,’’ असे गार्सिआ यांनी स्पष्ट केले. तपासासंदर्भात गार्सिआ सोमवारी ओमान येथे गेले होते. गार्सिआ यांचा अहवाल हान्स जोकॅअिम इकर्ट यांना सादर करण्यात येईल. इकर्ट हे फिफाच्या स्वतंत्र न्याय लवादाचे प्रमुख आहेत. इकर्ट या अहवालाचा अभ्यास करणार असून, त्यानंतर ते आवश्यक शिफारसी करतील आणि त्यानंतर आपला निकाल जाहीर करणार आहेत.
कतारला विश्वचषकाचे आयोजन मिळावे यासाठी फिफाला कोटय़वधी रुपयांची लाच दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गार्सिआ यांच्या अहवालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. २ डिसेंबर २०१०मध्ये झालेल्या कार्यक्रमात २०१८च्या विश्वचषकाचे आयोजन रशियाकडे तर २०२२च्या विश्वचषकाचे आयोजन कतारला बहाल करण्यात आले होते.
कतारप्रकरणी ब्लाटर-व्हाल्के यांचे मौन
ब्राझिलिया : २०२२च्या विश्वचषकाचे आयोजन कतारला देण्यासाठी फिफाला लाच देण्याच्या आरोपांबाबत फिफाचे प्रमुख पदाधिकारी सेप ब्लाटर आणि जेरोम व्हाल्के यांनी सूचक मौन बाळगले आहे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया येथे झालेल्या सोहळ्यात फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी ब्राझीलचे अध्यक्ष दिलमा रौसेफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रौसेफ यांच्याकडे विश्वचषक सुपूर्द केला आणि स्पध्रेच्या यशस्वी संयोजनासाठी त्यांनी ब्राझीलला शुभेच्छा दिल्या. परंतु कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. दुसरीकडे फिफाचे सरचिटणीस जेरोम व्हाल्के यांनी रिओ डी जानेरिओमधील प्रसारमाध्यम केंद्राचे अनावरण केले. यावेळी कतार विश्वचषकासंदर्भात पत्रकारांनी व्हाल्के यांच्यावर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ब्रिटनमधील ‘द संडे टाइम्स’ वृत्तपत्राने कतारला विश्वचषकाचे आयोजन मिळावे, यासाठी फिफाला लाच दिल्याचे वृत्त दिले होते.
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक बोलीप्रक्रियेतही गैरप्रकाराची शक्यता
सिडनी :२०२२च्या फुटबॉल विश्वचषकाच्या आयोजनासाठी गैरप्रकारांमध्ये अडकलेल्या संघटनांना विकास निधी वितरित केल्याप्रकरणी तपास करण्याची गरज असल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्या माजी फुटबॉल अधिकाऱ्याने व्यक्त केले. बोलीप्रक्रिया सुरू असताना कतार फुटबॉल संघटनेवरही अशाच स्वरुपाचे आरोप करण्यात आल्याचे ऑस्ट्रेलिया फुटबॉल महासंघाचे कंपनी व्यवहार खात्याचे प्रमुख बोनिटा मेरसिआड्स यांनी सांगितले. कतार विश्वचषकासाठी आयोजनासाठी लाच दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. कतारप्रमाणेच ऑस्ट्रेलियाच्या आवेदनाविषयीही तपासणीची आवश्यकता असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
कतार फुटबॉल संघटनेचे कृत्य ऑस्ट्रेलिया फुटबॉल महासंघापेक्षा फार वेगळे नव्हते. याप्रकरणी गार्सिआ पथकाने सखोल चौकशी केल्याचे फिफाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड गलोप यांनी सांगितले.