फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक इंडिया येत्या ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई अशा तीन शहरात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तिकीट विक्रीचा प्रारंभ भारताचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, फिफाचे लिंडसे टारप्ले, माजी भारतीय कर्णधार सुनील छेत्री व आशालता देवी यांच्या उपस्थितीत पार पडला. fifa.com/tickets या वेबसाईटवर फुटबॉल चाहत्यांना आपली जागा आरक्षित करता येणार आहे. यावेळी असंख्य फुटबॉल चाहते, प्रेषक आणि मान्यवर उपस्थित होते.
जागतिक दर्जाच्या स्पर्धेचा भारतीय फुटबॉल क्षेत्रावर पर्यायाने या खेळावर होणाऱ्या सखोल परिणामांचा विचार करुन तळागाळातील महिला प्रशिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्यात नेतृत्व गुण रुजवण्यासाठी ‘प्रशिक्षक शिक्षण शिष्यवृत्ती कार्यक्रम’ या उपक्रमाची सुरुवात याआधीच करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या १६ सत्रांमधून सुमारे ४०० महिला प्रशिक्षक तयार झाले आहेत.
या निमित्ताने विविध उपक्रमांची माहिती देताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष व संयोजन समितीचे चेअरमन कल्याण चौबे म्हणाले की, फिफा अंडर-१७ वुमन्स विश्वचषक इंडिया २०२२ स्पर्धेचे आयोजन हा केवळ एक सन्मानच नसून आमच्यासाठी बहुमोल संधी आहे. या स्पर्धेचा भारतीय फुटबॉल वर होणारा सकारात्मक परिणाम ध्यानात घेऊन फिफा, भारत सरकार, भारतीय फुटबॉल महासंघ, विविध राज्यांची सरकारे आणि प्रायोजक यांनी एकत्र येऊन महिला फुटबॉलच्या विकासासाठी विविध योजना आखल्या आहेत.
समितीचे चेअरमन म्हणाले की, फुटबॉल विश्वचषक २०२२ स्पर्धेसारख्या प्रमुख द्वैवार्षिक स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने तळागाळापर्यंतच्या मुली व महिलांपर्यंत फुटबॉलचा प्रसार होणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना विविध साधन सामग्री देऊन आणि प्रशिक्षणाची सोय करुन त्यांच्यात नेतृत्व गुण रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची आम्हाला संधी मिळाली आहे. या निमित्ताने ‘प्रशिक्षक शिक्षण शिष्यवृत्ती कार्यक्रम’ तसेच द ड्रीम फुटबॉल कार्निवल आणि अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी मदत केल्याबद्दल मी प्रायोजकांचा आभारी आहे.
हेही वाचा : नोवाक जोकोविच म्हणतो माझ्यात बरेच टेनिस अजून शिल्लक आहे, पत्रकार परिषदेत सूचक विधान
फिफाच्या प्रादेशिक सल्लागार बेलिंडा विल्सन यांनी म्हटले आहे की, पुढील महिन्यात भारतात आयोजित करण्यात येणारा फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक युवकांना प्रेरित करून भारतीय फुटबॉलची स्थिती सुधारण्यास मदत करेल.