मुंबईचा विस्तार जसजसा होऊ लागला व क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागल्यानंतर ब्रेबॉर्न व वानखेडे स्टेडियम्सही त्यासाठी अपुरी वाटू लागली. त्यातही नवी मुंबई परिसरात अधिकाधिक लोकवस्ती वाढल्यानंतर या भागातील चाहत्यांकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम असावे, या इच्छेमुळेच डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात २००८ मध्ये जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारण्यात आले.

क्रिकेटबरोबरच अन्य खेळांकरिताही त्याचा उपयोग झाला पाहिजे, या हेतूनेही तेथे अत्यानुधिक सुविधा निर्माण करण्यात आल्या. जलतरण, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन आदी खेळांकरिता अतिशय सुरेख सुविधा तेथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फुटबॉलमधील व्यावसायिक लीगमध्ये मुंबईच्या संघाचा सहभाग सुरू झाल्यानंतर त्यांनी या स्टेडियमचा उपयोग घरच्या सामन्यांकरिता सुरू केला. आपोआपच मुंबईतील फुटबॉलकरिता गती लाभली. इंडियन सुपर लीग फुटबॉलचा अंतिम सामना तेथे झाल्यानंतर त्यावर आणखीनच शिक्कामोर्तब झाले.

पूर्णपणे आच्छादित गॅलरी व खांबांचा कोणताही अडथळा नाही, यामुळे प्रेक्षकांना सामन्यांचा विनाअडथळा आनंद मिळतो. दोन भव्य पडद्यांमुळे विविध क्षणांचे पुनर्प्रक्षेपण चांगल्या पद्धतीने पाहता येते. स्टेडियमच्या सर्व परिसरावर डिजिटल कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवता येत असल्यामुळे स्टेडियममधील प्रत्येकाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे सोयीचे जाते.