जपान, होंडुरास, फ्रान्स आणि पदार्पणवीर न्यू कॅलेडोनिया यांचा समावेश असलेल्या ‘ई’ गटाचा उल्लेख अनिश्चिततेचा गट असाच करावा लागेल. या गटातील फ्रान्सने २००१मध्ये जेतेपदाचा चषक उंचावला असला तरी त्यांनी मागील १६ वर्षांत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सात कुमार स्पर्धाचा अनुभव गाठीशी असलेल्या जपानकडूनही निराशाजनक खेळ झाला आहे. मात्र आशियाई खंडात होत असलेल्या या स्पध्रेमुळे त्यांच्यावरील अपेक्षा उंचावल्या आहेत. होंडुरासकडून फार अपेक्षा नसल्या तरी पदार्पणात न्यू कॅलेडोनिया कशी कामगिरी करते, याची उत्सुकता सर्वाना आहे.

गट इ

होंडुरास : कुमार विश्वचषक स्पर्धेतील होंडुरास संघाची कामगिरी फार आशादायी झालेली नाही. २०१३ मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्यांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवता आला होता. त्याव्यतिरिक्त त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. होंडुरासने २००७ मध्ये विश्वचषक स्पर्धेत पदार्पण केले होते. त्यानंतर २०११ची स्पर्धा वगळता या संघाने तीन विश्वचषक स्पर्धात सहभाग घेतला असून यंदा ते पाचव्यांदा आपली छाप पाडण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चार वेळा या स्पर्धेत खेळूनही होंडुरासला १४ पैकी केवळ दोनच लढती जिंकण्यात यश आले आहे. त्यांनी हे विजय संयुक्त अरब अमिराती (२-१) आणि उझबेकिस्तान (१-०) या आशियाई संघांविरुद्ध मिळवले आहेत. विश्वचषक स्पर्धेतील मागील चारही सामन्यांत होंडुरासला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे भारतात त्यांच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मध्य अमेरिका पात्रता स्पर्धेत होंडुरासने दुसरे स्थान पटकावून भारतातील स्पर्धेचा प्रवेश निश्चित केला. क्युबावर मिळवलेल्या ७-१ अशा विजयामुळे त्यांच्या कामगिरीतील प्रगती दिसत असली तरी त्यात सातत्य राखण्यात ते अपयशी ठरले आहेत. कार्लोस मेजीया आणि पॅट्रिक पॅलासिओस हे त्यांचे प्रमुख खेळाडू आहेत.

जपान : जपान आठव्यांदा कुमार विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहे. १९९३ आणि २०११च्या स्पर्धामधील उपांत्यपूर्व फेरीपर्यंतची मजल ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. जपानने एएफसी १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून विश्वचषक स्पर्धेत पात्र होण्याचा मान मिळवला. त्यांनी या स्पर्धेत ४६ गोलचा वर्षांव केला आणि त्यात मंगोलियाविरुद्धचा १७-० हा सर्वात मोठा विजय ठरला. ताकेफुसा कुबो हा त्यांचा प्रमुख खेळाडू असून त्याला ‘जपानचा मेस्सी’ या नावाने ओळखले जाते. जपानने २०११च्या स्पर्धेत न्यूझीलंडवर ६-० असा विजय मिळवला. हा त्यांचा आणि आशियाई संघाने विश्वचषक स्पर्धेत मिळवलेला मोठा विजय आहे.

न्यू कॅलेडोनिया : न्यू कॅलेडोनिया विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करत आहे. ओशियानिक फुटबॉल महासंघाचे प्रतिनिधित्व करणारा हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनंतरचा तिसरा संघ आहे. परंतु आता ऑस्ट्रेलिया आशियाई फुटबॉल महासंघाकडून प्रतिनिधित्व करत आहे. बरोबर २० वर्षांपूर्वी ओशिनियन उपखंडातून विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच खेळण्याचा मान न्यूझीलंडने पटकावला आहे. भारतात होणाऱ्या या स्पर्धेत पहिल्यांदाच दोन ओशियानिक संघ सहभागी झाले आहेत. याआधी १९९९मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी सहभाग घेतला होता. १९८३ मध्ये त्यांनी ओएफसी १७ वर्षांखालील स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर ही स्पर्धा १६ वर्षांखालील वयोगटात खेळवण्यात आली आणि २००३मध्ये न्यू कॅलेडोनियाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विश्वचषक स्पर्धेची पात्रता मिळवण्यासाठी न्यू कॅलेडोनियाने अहोरात्र मेहनत घेतली. त्यांनी पपुआ न्यू गिनी आणि व्हॅनुआटू यांच्यावर विजय मिळवले, तर यजमान ताहितीला बरोबरीत रोखले. उपांत्य फेरीत त्यांनी सोलोमोन आयलंडवर ३-२ असा विजय मिळवत भारतातील स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला. अंतिम लढतीत न्यूझीलंडने ७-० अशा फरकाने त्यांना पराभूत केले.

फ्रान्स : विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या तीन युरोपियन देशांमध्ये फ्रान्सचा समावेश आहे आणि २०१७च्या स्पर्धेत सहभागी होणारा तो एकमेव संघ आहे. २००१मध्ये फ्रान्सने विश्वचषक उंचावला होता. युरोपियन उपखंडातील सोव्हिएट संघराज्य (१९८७) आणि स्वित्र्झलड (२००९) यांना ही स्पर्धा जिंकता आली आहे.

संकलन : स्वदेश घाणेकर