फिफा विश्वचषक २०१४ च्या अंतिम सामन्यात हरलेल्या अर्जेंटिना संघाचा प्रमुख खेळाडू लिओनेल मेस्सी त्यावेळी खूपच उदास दिसत होता. विजेतेपदाच्या लढतीतील पराभवानंतर त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्याचबरोबर आता २०२२ चा फिफा विश्वचषक जिंकल्यानंतरही त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. पण यावेळी मात्र आनंदाश्रू होते. त्याची पत्नी अँटोनेला रोकुझो हिला हे माहीत आहे. त्यामुळे तिने इन्सटाग्रामवर एक पोसट करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची पत्नी अँटोनेला रोकुझोच्या वेदनाही विजेतेपदानंतर ओसरल्या आहेत. तुम्ही इतकी वर्षे काय सहन केले ते आम्हाला माहीत आहे, असे तिने म्हटले आहे. २०१४ मध्ये संघ विश्वचषक फायनलमध्ये पराभूत झाला, तेव्हा अँटोनेला त्याच्या सोबत रिलेशनमध्ये होती. त्यावेळी त्याची अवस्था काय होती हे तिला माहीत आहे.
आता वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर तिने इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि मेस्सीचा आपल्या मुलांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये लिहिले, “वर्ल्ड चॅम्पियन. मला सुद्धा कळत नाही की सुरुवात कशी करावी… आम्हाला तुमचा किती अभिमान आहे. आम्हाला कधीही हार न मानायला शिकवले. धन्यवाद. आम्हाला शेवटपर्यंत लढायचे आहे .शेवटी हे झाले की तुम्ही जगज्जेता ठरला, आम्हाला माहित आहे की तुम्ही इतकी वर्षे काय सहन केले, तुम्हाला हे का साध्य करायचे होते! चला अर्जेंटिनाला जाऊया.”
रविवारी रात्री दोहा येथील लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. अतिरिक्त वेळेपर्यंत सामना ३-३ असा बरोबरीत होता. अशा स्थितीत सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला, जिथे अर्जेंटिना संघाने ४-२ असा विजय मिळवला. फ्रान्सचा संघ सलग दुसरे जेतेपद पटकावण्यापासून वंचित राहिला. या सामन्यात मेस्सीने २ तर किलियन एमबाप्पेने ३ गोल केले.