कतारमध्ये खेळला जाणारा फिफा विश्वचषक आता शेवटच्या दिशेने सरकला असून आज अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल. भारत विश्वचषकात सहभागी होत नसला तरी त्याची क्रेझ संपूर्ण देशात आहे. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू फुटबॉलचे प्रचंड चाहते आहेत आणि ते हा अंतिम सामना पूर्ण आनंदाने पाहतील. टीम इंडियाचे खेळाडू अर्जेंटिना आणि फ्रान्समधून कोणाला सपोर्ट करतील यावर केएल राहुलने मजेशीर उत्तर दिले आहे.
भारताने बांगलादेशविरुद्धची पहिली कसोटी जिंकली असून आता संघ विश्रांती घेणार आहे. संघाचा कर्णधार केएल राहुलने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आज रात्रीचा प्लॅन उघड केला आणि रात्री संघाचे खेळाडू काय करणार आहेत हे सांगितले. राहुलने सांगितले की, सर्व खेळाडू येत्या फिफा विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना रात्री पाहतील आणि या मोठ्या सामन्याचा आनंद लुटतील. संघातील खेळाडूंचा आवडता संघ कोणता हेही राहुलने सांगितले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने यजमानांचा १८८ धावांनी पराभव केला होता. या विजयानंतर संघाचा कर्णधार केएल राहुल खूप आनंदी दिसला आणि त्याने संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांचे कौतुक केले. दरम्यान, पत्रकाराने फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याबाबत प्रश्न विचारले. पत्रकाराने केएलला विचारले की अर्जेंटिना आणि फ्रान्समध्ये भारतीय संघ कोणाला सपोर्ट करेल. यावर केएल म्हणाला की “आमच्या सर्व खेळाडूंचे आवडते संघ हे ब्राझील आणि इंग्लंड आहेत पण ते विश्वचषकातून आधीच बाहेर पडल्यामुळे आम्ही फक्त अंतिम सामन्याचा आनंद घेऊ.
पुढे बोलताना राहुल म्हणाला, “आम्ही रात्री विश्वचषकाचा अंतिम सामना पाहणार आहोत कारण बऱ्याच दिवसांनी आम्ही सलग पाच दिवस खेळलो, त्यामुळे आम्ही थोडे थकलो आहोत.” मात्र, आम्ही अंतिम सामना पाहू, एकत्र जेवू आणि त्याचा आनंद घेऊ. अर्जेंटिनाला कोण सपोर्ट करेल आणि फ्रान्सला कोण सपोर्ट करेल हे सांगता येत नाही, पण हा सामना मोठा असेल आणि तो रंगतदार होईल अशी अपेक्षा करतो.”
फुटबॉलच्या मैदानावर आतापर्यंत अर्जेंटिना आणि फ्रान्स १२ वेळा भिडले आहेत. यामध्ये अर्जेंटिनाने ६ सामने जिंकले आहेत. फ्रान्सने केवळ तीन सामने जिंकले असून तीन अनिर्णित राहिले आहेत. या दोघांमध्ये पहिला सामना १९३० मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात झाला होता. अर्जेंटिनाने हा सामना १-० ने जिंकला. त्याच वेळी, दोघांमधील शेवटचा सामना २०१८ फिफा वर्ल्ड कपमध्ये झाला होता, ज्यामध्ये फ्रान्सने अर्जेंटिनाला पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला होता.