portugal vs switzerland: पोर्तुगालच्या संघाने बुधवारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यामध्ये अर्धा डझन गोल करत पोर्तुगालने उपांत्यपूर्व फेरी गाठली. विशेष म्हणजे या विजयाचा शिल्पकार ठरला क्रिस्तियानो रोनाल्डोच्या जागी संघात स्थान मिळवलेला २१ वर्षीय गोनकॅलो रामोस. रामोसने या सामन्यामध्ये हॅट-ट्रीक केली. त्याचबरोबर पोर्तुगालचा स्ट्राइकर पेपे, राफाल गुरीरो, राफाल लॅओ यांनी प्रत्येकी एक गोल केला.
सामन्याच्या सुरुवातीलाच पोर्तुगालच्या चाहत्यांना धक्का बसला जेव्हा संघाचा स्टार खेळाडू रोनाल्डोला बेंचवर बसवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. रोनाल्डोशिवाय खेळताना संघ कशी कामगिरी करणार याकडे लक्ष लागलेलं होतं. जो फेलिक्सने पोर्तुगालकडून पहिल्यांदा गोल करण्याचा प्रयत्न केला. ब्रुनो फर्नांडिसला उत्तम पास जोने केला मात्र ब्रुनोला चेंडूवर नियंत्रण ठेवता आलं नाही. सामन्याच्या नवव्या मिनिटाला स्वित्झर्लंडच्या ब्रिल एम्बोलोने गोल करण्याचा प्रयत्न केला. त्याला बचावफळीतील दोन खेळाडूंना चकवा देण्यातही यश आलं पण पेपेने त्यांच्याकडून चेंडूचा ताबा मिळवला आणि स्वित्झर्लंडचा दुसरा प्रयत्नही फसला. पहिल्या १३-१४ मिनिटांमध्ये गोलपोस्टवर केवळ एक गोल डागण्याचा प्रयत्न झाल्याने सामन्याला संथ सुरुवात झाली.
१७ व्या मिनिटाला पोर्तुगालने सामन्यात आघाडी घेतली. गोनकॅलो रामोसला जो फेलिक्सने केलेला पास त्याने गोलमध्ये धाडला. आपलं उत्तम कौशल्य दाखवत रामोसने हा गोल केला. या गोलचा अँगल चांगलाच चर्चेत राहिला. गोलपोस्टच्या बारजवळून चेंडू अलगद जाळ्यात स्थिरावला. त्यानंतर पेपेने ३३ व्या मिनिटाला गोल करत पोर्तुलगाची आघाडी २-० वर नेली. मध्यंतरापर्यंत पोर्तुगालचा संघ दोन गोल्सने आघाडीवर होता तर स्वित्झर्लंडच्या खात्यावरही एकही गोल नव्हता.
नक्की वाचा >> विश्लेषण: FIFA वर्ल्ड कपवर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय?
मध्यंतरानंतर सामना सुरु झाल्यानंतर सहव्याच मिनिटाला गोनकॅलो रामोसने सामन्यातील आपला दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल गेला. त्यानंतर ५५ व्या मिनिटाला गोनकॅलो रामोसचा सहकारी राफाल गुरीरोने गोल करत पोर्तुलागची आघाडी ४-० वर नेली. सामन्यातील ५८ व्या मिनिटाला स्वित्झर्लंडला भोपळा फोडण्यात यश आलं जेव्हा मॅन्युअल अकांजीने पोर्तुगालची बचावफळी भेदत गोल केला. मात्र स्वित्झर्लंडचा हा आनंद फार काळ टीकला नाही कारण उर्वरित सामन्यामध्ये पोर्तुगालने दोन गोलची भर घातली आणि स्वित्झर्लंडला एकही गोल करता आला नाही. पोर्तुगालसाठी पाचवा गोल गोनकॅलो रामोसनेच केला. ६७ व्या मिनिटाला गोल करत गोनकॅलो रामोसने हॅट-ट्रीक केली. पेले यांच्यानंतर सर्वात कमी वयात विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत हॅट-ट्रीक करणारा गोनकॅलो रामोस हा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
नक्की वाचा >> विश्लेषण: फिफा वर्ल्ड कपमध्ये शेवटचे साखळी सामने एकाच वेळी का खेळवतात? काय होता १९८२मधील ‘लाजिरवाणा सामना’?
सामन्यामधील ९० मिनिटांच्या खेळानंतरच्या अतिरिक्त वेळातही पोर्तुगालने गोल केला. राफाल लॅओने ९२ व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालची आघाडी ६-१ वर नेऊन ठेवली. सामना संपल्याची घोषणा झाली तेव्हा हाच अंतिम स्कोअर ठरला. आता उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोर्तुगालचा सामना मोरक्कोशी होणार आहे. मोरक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा ३-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.