१९९०च्या दशकात बेल्जियमने फुटबॉलमधील सुवर्णकाळ अनुभवला. पण गुणवत्ता असूनही फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीत पात्र ठरण्यासाठी बेल्जियमला तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. मात्र या १२ वर्षांत बेल्जियमने आपल्या शैलीत, खेळामध्ये कमालीची सुधारणा करत आंतरराष्ट्रीय खेळाडूंची एक नवी फळी तयार केली आहे. मार्क विलमोट्स यांच्या प्रशिक्षकपदाखालील बेल्जियमची दुसरी सुवर्णपिढी आता इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे. ब्राझील, स्पेन, जर्मनी आणि अर्जेटिना या फुटबॉलमधील महासत्ता समजल्या जाणाऱ्या संघांना नमवण्याची ताकद बेल्जियममध्ये आहे. म्हणूनच दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू, सर्वोत्तम संघ यामुळे बेल्जियमचा संघ या वेळी फिफा विश्वचषकात डार्क हॉर्स म्हणून ओळखला जात आहे.
यूएफा गटातून क्रोएशिया, सर्बिया, स्कॉटलंड, वेल्स, मसेडोनिया या संघांवर वर्चस्व गाजवत बेल्जियमने अ गटात अव्वल स्थान पटकावले. १० सामन्यांत फक्त चार गोल स्वीकारून २६ गुणांसह बेल्जियमने फिफा विश्वचषकासाठी स्थान प्राप्त केले. त्यामुळे फिफा विश्वचषकासाठी बेल्जियम हा संघ प्रबळ दावेदारांमध्ये गणला जात आहे. सहप्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळत असताना मे २०१२मध्ये मार्क विलमोट्स यांच्याकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली. मात्र त्यानंतर बेल्जियमच्या कामगिरीचा आलेख उंचावतच गेला. तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत बेल्जियमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विलमोट्स यांच्याकडून आता देशवासीयांना भरपूर अपेक्षा आहेत.
लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो, आंद्रेस इनियेस्टा, वेन रूनी आणि फर्नाडो टोरेस यांच्यासारखे दिग्गज खेळाडू भलेही बेल्जियममध्ये नसतील, पण प्रतिस्पध्र्याच्या छातीत धडकी भरवणारा इडेन हझार्डसारखा आक्रमकवीर त्यांच्याकडे आहे. सध्या सुरेख फॉर्मात असलेल्या हझार्डचा वेग, तांत्रिक क्षमता आणि गोल करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. गेल्या दोन वर्षांत चेल्सीसाठी ३० गोल करणारा हझार्ड आता विश्वचषकात आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. क्लब आणि देशासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा विन्सेन्ट कोम्पानी म्हणजे बेल्जियमची खरी ताकद आहे. त्याचबरोबर सध्याचा जगातील सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून ओळखला जाणारा थिबाऊट कोर्टियस हासुद्धा बेल्जियमकडे आहे. त्याच्या सुरेख कामगिरीमुळेच अॅटलेटिको माद्रिदला या मोसमात चॅम्पियन्स लीग आणि ला लीगा स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले.
बेल्जियम (ह-गट)
फिफा क्रमवारीतील स्थान : १२
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : १२ वेळा (२०१४सह)
* चौथे स्थान : १९८६
* बाद फेरी : १९९०, १९९४, २००२
संभाव्य संघ
* गोलरक्षक : थिबाऊट कोर्टियस, सायमन मिग्नोलेट, कोएन कॅस्टिल्स, सिल्वियो प्रोटो. बचावफळी : टोबी अँडरवेईरेल्ड, अँथनी वान्डेन बोरे, लॉरेन्ट सिमान, विन्सेन्ट कोम्पानी, डॅनियल व्हॅन बायटेन, थॉमस वर्माएलेन, निकोलस लोम्बाएर्ट्स, जॅन वटरेनघेन. मधली फळी : अॅलेक्स विट्सेल, स्टीव्हन डेफोर, मरौने फेलिआनी, मौसा डेम्बेले, नेसर चाडली, केव्हिन डे ब्रूयेन, इडेन हझार्ड, ड्राएस मेर्टेन्स, केव्हिन मिराल्लास, अदनान जानुझाज. आघाडीवीर : रोमेलू लुकाकू, डिव्होक ओरिगी.
* स्टार खेळाडू : विन्सेन्ट कोम्पानी, मरौने फेलिआनी, इडेन हझार्ड, रोमेलू लुकाकू,
* व्यूहरचना : ४-३-३ किंवा ४-२-३-१
* प्रशिक्षक : मार्क विलमोट्स.
अपेक्षित कामगिरी
रशिया, दक्षिण कोरिया आणि अल्जेरिया यांच्यासारख्या संघांचा गट पहिल्या फेरीत मिळाल्यामुळे बेल्जियमचे प्रशिक्षक मार्क विलमोट्स हे काहीसे आनंदात असतील. दक्षिण कोरिया आणि अल्जेरिया हे दोन्ही कमकुवत संघ असल्यामुळे गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी रशिया आणि बेल्जियम यांच्यात थेट लढत रंगणार आहे. बेल्जियम हा संघ तगडा असल्यामुळे ते गटात अव्वल स्थान पटकावतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीत त्यांची गाठ ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीवर अवलंबून असलेल्या पोर्तुगालशी पडणार आहे. विलमोट्स यांनी युरो २०१६च्या स्पर्धेसाठी संघाची मोट बांधण्याचे ठरवले असल्यामुळे ते पोर्तुगालचा अडसर दूर करून उपांत्यपूर्व फेरी गाठतील, अशी चिन्हे आहेत. पण उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनासारखा मातब्बर संघ समोर आल्यानंतर त्यांचे आव्हान तिथेच संपुष्टात येणार आहे.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या संघांपैकी तगडा संघ म्हणून बेल्जियमचे नाव घेतले जात आहे. इडेन हझार्ड, रोमेलू लुकाकू आणि अनुभवी विन्सेन्ट कोम्पानी अशी तगडय़ा फुटबॉलपटूंची फौज त्यांच्याकडे असल्यामुळे फिफा विश्वचषकात अभूतपूर्व कामगिरी करण्याची बेल्जियमसाठी हीच सुवर्णसंधी आहे. त्याचबरोबर युरोपमधील स्थानिक लीग स्पर्धामध्ये चमक दाखवणारे अनेक प्रतिभावान खेळाडू बेल्जियमकडे आहेत. धडाकेबाज आक्रमकवीर आणि अभेद्य बचाव ही बेल्जियमची भक्कम बाजू आहे. मात्र स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी बेल्जियमच्या आघाडीवीरांना गोल करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. प्रत्येक आघाडय़ांवर जागतिक किर्तीचे किमान दोन खेळाडू बेल्जियमकडे आहेत. त्यामुळे बेल्जियमच्या गुणवत्तेविषयी कुणालाच शंका नाही. मात्र प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये खेळण्याचा अभाव बेल्जियमला जाणवत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा