स्पेन, इटली, पोर्तुगाल, इटली, इंग्लंड अशा जेतेपदासाठी संभाव्य दावेदारांमध्ये गणना होणाऱ्या संघांनी विश्वचषकातून गाशा गुंडाळला. त्यांच्या ताकदीची, स्टार खेळाडूंची सातत्याने चर्चा होत होती. मात्र प्रत्यक्षात मैदानावर या संघांचे आव्हान छोटय़ा संघांनी संपुष्टात आणले. जर्मनीविरुद्ध मोठा पराभव स्वीकारावा लागलेल्या पोर्तुगालने अमेरिकेविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली होती. या समीकरणामुळे घानाविरुद्ध त्यांना मोठा विजय मिळवणे अनिवार्य होते. गोलफरकाच्या बाबतीत ते खूपच पिछाडीवर होते. मात्र स्पर्धेत पहिल्यांदा त्यांनी चांगला खेळ केला. पोर्तुगालची ओळख असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने गोल करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. रोनाल्डोसह बहुसंख्य खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ केला. त्यांनी विजय मिळवला, मात्र तो पुरेसा ठरला नाही. विजयाने शेवट केल्याचे समाधान त्यांना मिळाले असेल. परंतु गुरुवारच्या सामन्यात त्यांनी जसा खेळ केला तसा आधीच्या लढतीत केला असता तर ‘ग’ गटाचे चित्र वेगळे दिसले असते. एक संघ म्हणून एकत्रित कामगिरी करण्यात ते मागे राहिले. रोनाल्डोचा संघ ही त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम होती. अर्जेटिनाचे खेळाडू लिओनेल मेस्सीला गोलसहकार्य करत आहेत ती वृत्ती रोनाल्डोच्या सहकाऱ्यांमध्ये आढळली नाही.
दुसरीकडे गुणवान संघ असूनही घानाला प्राथमिक फेरीतूनच माघारी परतावे लागले आहे. अमेरिकेने त्यांच्यावर दमदार विजय मिळवला. मात्र या पराभवातून सावरत त्यांनी जर्मनीला बरोबरीत रोखले. अखेरच्या लढतीत पोर्तुगालवर दणदणीत विजय मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न अपुरेच ठरले. घानाने ताकदवान खेळ करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या खेळाडूतर्फे झालेला स्वयंगोल पोर्तुगालसाठी फायद्याचा ठरला. मात्र वेगवान खेळामध्ये अशा गोष्टी घडतात. कोणताही खेळाडू ठरवून स्वयंगोल करत नाही. वेगाच्या नादात ही चूक झाली आणि घानाचा संघ पिछाडीवर गेला.
या विश्वचषकाच्या निमित्ताने अल्जेरिया, ग्रीस, स्वित्र्झलड, कोस्टा रिका, नायजेरिया अशा छोटय़ा संघांनी दिमाखात आगेकूच केली आहे. अल्जेरियाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडवत प्रतिस्पध्र्याना अडचणीत आणले. याच शैलीच्या जोरावर त्यांनी दक्षिण कोरियावर मोठा विजय मिळवला, तर रशियाविरुद्ध बरोबरी केली. अल्जेरिया, कोस्टा रिका, ग्रीस या देशांना फुटबॉलची मोठी परंपरा नाही. त्यांच्या खेळाडूंना क्लबच्या माध्यमातून मोठय़ा खेळाडूंविरुद्ध खेळण्याची संधी मिळत नाही. त्यांचे आंतरराष्ट्रीय सामनेही मर्यादित असतात. अनुभवी खेळाडूंचा ताफा त्यांच्याकडे नाही. मात्र असे सगळे असले तरी या संघांनी चिवटपणे खेळ करत बाद फेरी गाठली आहे. मर्यादित गुणवत्ता असूनही मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते हे या संघांनी सिद्ध केले आहे. अल्जेरियाच्या एका खेळाडूला डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. मात्र संघाला बाद फेरीत स्थान मिळवून देण्यासाठी मैदानात असणे आवश्यक असल्याचे त्या खेळाडूला जाणवले. शेवटच्या मिनिटापर्यंत चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्याची जिद्द अल्जेरियासाठी सकारात्मक ठरली. अल्जेरियासमोर बाद फेरीत मातब्बर जर्मनीचे आव्हान असणार आहे. फुटबॉलसारख्या खेळात एखाद्या दिवशी चमत्कार घडू शकतो. जर्मनीची कामगिरी खालावल्यास, अल्जेरियास इतिहास घडवण्याची संधी आहे.
तुमची पाश्र्वभूमी काय आहे, तुम्हाला पायाभूत सुविधा किती मिळतात, मार्गदर्शन करण्यासाठी चांगले प्रशिक्षक आहेत का, या प्रश्नांमध्ये अडकण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत इच्छाशक्ती दृढ करत खेळण्यावर या छोटय़ा देशांनी भर ठेवला. छोटे असल्याने कमकुवत समजण्यापेक्षा मोठे होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. विश्वचषकाची बाद फेरी या संघांसाठी मोठे यश आहे. मातब्बर संघ घरी गेलेले असताना लिंबूटिंबू म्हणून गणना होणाऱ्या संघांचा हा प्रवास चाहत्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा