विश्वचषकातील सर्वात उत्कंठावर्धक लढत असे ज्या लढतीचे वर्णन केले जात होते, त्या सामन्यामध्ये ब्राझीलने अक्षरश: हाराकिरी पत्करली. जर्मनीच्या झंझावातासमोर यजमान ब्राझील निष्प्रभ ठरला. संघ हरला यात काही विशेष नाही, तो खेळाचा भाग आहे. मात्र ज्या पद्धतीने ब्राझीलच्या संघाचे पतन झाले, ते ब्राझीलच्या चाहत्यांना हताश करणारे होते. विश्वचषकाचे आशास्थान असलेला नेयमार दुखापतग्रस्त झाला. त्यांचा कर्णधार थिआगो सिल्वा दोन पिवळ्या कार्ड्समुळे खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आणि ब्राझीलने आशाच सोडली. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे, याचाच जणू त्यांना विसर पडला. एखाद्या खेळाडूचे अपवादात्मक कौशल्य संघासाठी कणा असतो. यात वावगे काहीच नाही, मात्र संघ केवळ याच खेळाडूवर विसंबून राहणार असेल तर ते नक्कीच चिंताजनक आहे. दोन प्रमुख खेळाडू महत्त्वाच्या लढतीत नसणे, ही कोणत्याही संघाला पिछाडीवर नेणारी घटना आहे. मात्र जर्मनीविरुद्ध ब्राझीलचा संघ संघर्ष करायलाही तयार नव्हता. आपण हरायचे आहे, फक्त किती फरकाने ते पाहायचे, असाच त्यांचा दृष्टिकोन होता. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी त्यांनी काही अभ्यास केल्याचेही जाणवत नव्हते. आक्रमणपटू आणि बचावपटू यांच्यात कोणताही समन्वय नव्हता. ज्या सहजतेने जर्मनीचे गोल होत होते, त्यातून ब्राझीलची अगतिकता स्पष्ट होत होती. ज्या देशात फुटबॉल हा धर्म आहे. छोटय़ा-छोटय़ा वस्त्यांमध्ये, समुद्रकिनाऱ्यावर जिथे फुटबॉल खेळला जातो, गुणवान फुटबॉलपटूंची खाण असे ज्या देशाला समजले जाते, त्या संघाने अशा पद्धतीने हार मानावी, हे अनाकलनीय आहे. लुइस फेलिपे स्कोलारी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ अननुभवी आहे. दडपणाच्या परिस्थितीचा त्यांच्या खेळाडूंना सराव नाही, हेही मान्य. परंतु जर्मनीविरुद्धच्या मानहानीकारक पराभवाने त्यांची कमकुवत मनोवृत्ती समोर आली आहे. ब्राझीलच्या फुटबॉल इतिहासातील हा काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. सर्व योजना, डावपेच फसले आणि काहीच मनाजोगते झाले नाही, तर काय परिस्थिती ओढवते, याचा धडा ब्राझीलला मिळाला आहे. आपण किती पाण्यात आहोत, कोणत्या गोष्टींत, किती प्रमाणात सुधारणा आवश्यक आहे, याची स्पष्ट जाणीव ब्राझीलच्या खेळाडूंना या पराभवाने झाली असेल. ब्राझीलसाठी हा अपघात दिवस म्हणून ओळखला जाईल. मात्र अपघातानंतरही सावरावे लागते, त्याप्रमाणे ब्राझीलला या पराभवाच्या आठवणीतून बाहेर पडावे लागेल. दुसरीकडे जर्मनीने आपली खरी ताकद जगाला दाखवून दिली आहे. विश्वचषकाची उपांत्य फेरीची लढत आणि समोर यजमान ब्राझील संघ असे समीकरण असताना जर्मनीने आपली सर्व अस्त्रे परजत आपली शक्ती सिद्ध केली आहे. सातत्य किती महत्त्वाचा पैलू आहे, हे पुन्हा एकदा जर्मनीने दाखवून दिले आहे. मिरोस्लाव्ह क्लोस, आंद्रे शुरले, टोनी क्रूस यापैकी कोणाच्याही नावाला ख्रिस्तियानो रोनाल्डो किंवा लिओनेल मेस्सीप्रमाणे वलय नाही. परंतु सातत्य, चिकाटी आणि प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहत कामाशी राखलेली सचोटी यासाठी हे खेळाडू ओळखले जातात. मोठय़ा सामन्यात प्रदर्शन उंचावण्याची त्यांची क्षमता जगभरातल्या संघांसाठी शिकण्यासारखे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2014 रोजी प्रकाशित
ब्राझीलसाठी काळा दिवस!
विश्वचषकातील सर्वात उत्कंठावर्धक लढत असे ज्या लढतीचे वर्णन केले जात होते, त्या सामन्यामध्ये ब्राझीलने अक्षरश: हाराकिरी पत्करली.

First published on: 10-07-2014 at 02:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 black day for brazil