ब्राझीलमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे फुटबॉल. ब्राझील आणि फुटबॉल हे जणू समीकरणच. प्रत्येक ब्राझीलवासीयाच्या नसानसांत फुटबॉल हा खेळ भिनलेला. अगदी प्रत्येक रस्त्यारस्त्यावर, समुद्रकिनाऱ्यावर फुटबॉल हा खेळ खेळला जातो. ब्राझिलियन संस्कृतीवरही फुटबॉलचा प्रचंड पगडा आहे. फुटबॉल न खेळलेला
फुटबॉलवेडय़ा या देशात जगातील सर्वोत्तम महासोहळ्याचे आयोजन म्हणजे देशवासीयांसाठी अत्युच्च आनंदाचा क्षण. एरव्ही आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी ब्राझीलवासीय जिवाचे रान करतात. मात्र हाच सोहळा तब्बल ६४ वर्षांनंतर आपल्या मायदेशात होत असल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नसता; पण बेकारी, शिक्षणाचा अभाव, पायाभूत सोयीसुविधांची वानवा, भ्रष्टाचार, गुन्ह्य़ांचे वाढलेले प्रमाण यामुळे त्रस्त असलेली ब्राझीलची जनता या सोहळ्याविरोधात नाखूश आहे. त्यांच्या नाखूश असण्याचे कारणही रास्तच आहे.
कोणत्याही विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रत्येक संयोजक देशाला पायाभूत सोयीसुविधा आणि स्टेडियम्सच्या बांधणीसाठी अमाप पैसा खर्च करावा लागतोच. २०१४च्या फिफा विश्वचषकाचे आयोजन ब्राझील करेल, अशी घोषणा २००७मध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइस इनासियो द सिल्वा यांनी केल्यानंतर देशभर जल्लोष साजरा केला गेला. विश्वचषकाचे कोणतेही काम लोकनिधीतून केले जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले होते, पण फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासातील हा सर्वात महागडा सोहळा ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील २०१०च्या सोहळ्यापेक्षा दुप्पट खर्च म्हणजे ११ अब्ज अमेरिकन डॉलर आतापर्यंत खर्च करण्यात आलेत. त्यापैकी ३.५ अब्ज स्टेडियमच्या पुनर्बाधणीसाठी आणि उर्वरित ७.५ अब्ज डॉलर विमानतळ, प्रमुख शहरांमध्ये मेट्रो उभारणे आणि अन्य ५६ पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांसाठी खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा खर्च दुपटीने वाढला तेव्हा जनतेच्या रागाचा पारा वाढला आणि त्यांनी थेट रस्त्यांवर येऊन सरकारविरोधात निदर्शने केली. गेल्या वर्षी झालेल्या कॉन्फेडरेशन चषकाच्या निमित्ताने ब्राझिलियन जनतेचा रोष प्रथमच पाहायला मिळाला. त्यानंतरही अधूनमधून ही आग धगधगत आहे.
एकीकडे बेकारी आणि महागाईने होरपळलेल्या जनतेसाठी महत्त्वाच्या सोयीसुविधा उभारण्यापेक्षा ब्राझील सरकारने विश्वचषकाचे शिवधनुष्य पेलले. त्यामुळेच जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. आम्हाला विश्वचषक स्पर्धा नको, शिक्षण, दळणवळण आणि अन्य सुविधा द्या, अशी त्यांची एकमेव भावना होती. कोणत्याही विश्वचषक स्पर्धेवर केलेला खर्च वसूल होत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास; पण या स्पर्धेमुळे नोकऱ्या, पर्यटन आणि उद्योगधंद्यांना तेजी येईल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल, या हेतूनेच विश्वचषकाचे आयोजन करण्याचा चंग ब्राझील सरकारने बांधला, पण तेथील जनतेला याचे सोयरसुतक नाही. विश्वचषकामुळे ब्राझीलवर ३.५ अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज झाले आहे, असा अंदाज ब्राझिलियन डेव्हलपमेंट बँकेने वर्तवला आहे. हा बोजा आणखीनही वाढेल आणि विश्वचषकाचे यशस्वी आयोजनही होईल, पण जनतेच्या भावनांचा ब्राझील सरकार विचार करणार का, हा प्रश्न आहे. त्यामुळे ‘कुणी आम्हालाही समजून घेईल का?’ अशी आर्त भावना येथील जनतेची आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा