फुटबॉलच्या बाबतीत ब्राझीलसारखा दर्जा अन्य कुठलाही संघ गाठू शकणार नाही. इटली, जर्मनी आणि अर्जेटिना या फुटबॉलमधील महासत्ता देशांनी अमाप दिग्गज फुटबॉलपटू घडवले असतील. पण दर्जाच्या बाबतीत ब्राझीलशी कोणताही संघ बरोबरी करू शकत नाही, हे वास्तव आहे. १९५८, १९७० आणि १९८२ सालचे विश्वचषक विजेते ब्राझीलचे संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक होते. मात्र १९९४ आणि २००२च्या विजेत्या ब्राझील संघाने अनेक महान फुटबॉलपटू देशाला दिले. आतापर्यंत पेले, रोनाल्डो, रोमारियो यांच्यासारख्या अनेक दिग्गज आघाडीवीरांनी स्वत:च्या बळावर ब्राझीलला विश्वचषक जिंकून दिले आहेत. पण सध्याच्या ब्राझील संघाला आघाडीवीरांच्या दमदार कामगिरीची वाट पाहावी लागत आहे.
 एक काळ असा होता, की देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळण्याकरिता ब्राझीलच्या अव्वल आघाडीवीरांमध्ये चुरस असायची. ब्राझीलच्या अनेक पिढय़ा पेले, रोमारियो, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो या आघाडीवीरांचा खेळ पाहून मोठय़ा झाल्या. पेले, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो या खेळाडूंचा खेळ पाहताना डोळ्यांचे पारणे फिटायचे. पण नेयमार वगळता सध्याच्या ब्राझील संघातील आघाडीवीरांमध्ये तो दर्जा दिसत नाही. लुइझ फिलिप स्कोलारी यांनी हल्क, फ्रेड आणि जो  या आघाडीवीरांवर विश्वास दाखवला. पण दुखापतींनी त्रस्त असलेले, खराब फॉर्मात असलेले हेच ते आघाडीवीर ब्राझीलला घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकून देतील का, असा प्रश्न ब्राझीलच्या चाहत्यांना पडला आहे. पेले यांनी १९५८मध्ये तब्बल सहा गोल करून ब्राझीलला पहिलावहिला विश्वचषक जिंकून दिला. रोमारियो यांच्या पाच गोलांच्या बळावर ब्राझीलने १९९४मध्ये विश्वचषकावर नाव कोरले होते. रोनाल्डो तर २००२मध्ये ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरला होता. त्याच्याच आठ गोलांच्या कामगिरीमुळे ब्राझीलला पाचव्यांदा विश्वचषकावर मोहोर उमटवता आली. पण नेयमारसह हल्क, फ्रेड आणि जो हे ब्राझीलचे मायभूमीत विश्वचषक पटकावण्याचे स्वप्न साकार करून देतील का, ही चिंता सध्या ब्राझीलवासीयांना सतावत आहे.
हल्क हा स्कोलारी यांच्या विश्वचषक मोहिमेतील मुख्य शिलेदार. मात्र आतापर्यंत चारही सामन्यांमध्ये त्याला खाते खोलता आलेले नाही. बाद फेरीच्या सामन्यात चिलीने ब्राझीलसमोर कडवे आव्हान उभे केले होते. या सामन्यात हल्कने गोल केला. पण खांद्यावर चेंडू झेलल्यामुळे त्याचा हा गोल नाकारण्यात आला. त्याउलट पेनल्टी-शूटआऊटमध्ये हल्कच्या गोलनंतर ब्राझीलला विजय साजरा करायचा होता. पण त्याला पेनल्टीवर गोल करण्यात अपयश आले. अखेर नेयमारच्या गोलनंतर चिलीच्या गोंझालो जाराचा प्रयत्न हुकल्यामुळे ब्राझीलला विजय मिळवता आला. फ्रेड सध्या खराब फॉर्म आणि तंदुरुस्त नसल्यामुळे सर्वाच्या टीकेचा धनी बनला आहे. साखळी फेरीतील पहिल्या दोन सामन्यानंतर तिसऱ्या सामन्यात एक गोल करून फ्रेडने टीकाकारांना चोख उत्तर दिले. पण चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी धडपडणारा फ्रेड अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. जो याला मोजका वेळ संधी मिळाली आहे, पण चिलीविरुद्ध गोल करण्याची सुरेख संधी असतानाही त्याला गोल करता आला नव्हता. नेयमारने आपल्यावरील जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिगेझनंतर नेयमारने चार गोल लगावले आहेत. पण एकटा नेयमार ब्राझीलला तारणार का, याचे उत्तर ब्राझीलला शोधावे लागणार आहे.
काही वर्षांपूर्वी अलेक्झांड्रे पॅटो हा जगातील सर्वोत्तम आघाडीवीर समजला जात होता. पेले यांचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. १८व्या वर्षी ब्राझीलतर्फे पदार्पणाच्या सामन्यात गोल करून पॅटोने पेले यांचा विक्रम मोडला होता. पण कोवळ्या वयातच त्याच्यावर मोठी जबाबदारी पडली. पण त्याचे गुडघे, मांडय़ांचे स्नायू ही जबाबदारी पेलू शकले नाहीत. दुखापतींमुळे अनेक महत्त्वाच्या सामन्यांना मुकणाऱ्या पॅटोची कारकीर्द आता टांगणीला लागली आहे. केईरिसन या युवा आक्रमकपटूकडूनही ब्राझीलला मोठय़ा अपेक्षा होत्या. २००८मध्ये ब्राझीलच्या अव्वल लीग स्पर्धेत २८ गोल झळकावणाऱ्या केईरिसनला बार्सिलोनाने पाच वर्षांसाठी करारबद्ध केले. पण बार्सिलोनातर्फे एकही सामना त्याच्या वाटय़ाला आला नाही. गॅब्रियल बाबरेसा दा सांतोस याच्या गुणवत्तेचा दर्जा नेयमारपेक्षाही सरस होता. अफाट ऊर्जा, शारीरिक क्षमता आणि चेंडूला अंतिम दिशा दाखवण्याची त्याची पद्धत नेयमारपेक्षाही वाखाणण्याजोगी आहे. पण त्याच्या कामगिरीतही सातत्य नाही. चिलीने ‘काँटे की टक्कर’ दिल्यामुळे ब्राझीलचे आव्हान अंतिम फेरीपूर्वीच संपुष्टात येते का, अशी भीती चाहत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे ब्राझीलला रोनाल्डो, पेले यांच्यासारख्या स्ट्रायकर्सची गरज भासू लागली आहे.

Story img Loader