पहिल्या सामन्यात क्रोएशियावर दमदार विजय मिळवला असला तरी दुसऱ्या सामन्यात मेक्सिकोविरुद्धचा सामना बरोबरीत सुटल्यामुळे यजमान ब्राझीलचा संघ थोडासा निराश नक्कीच असेल. पण कॅमेरूनला पराभूत करून विजयाच्या वाटेवर परतण्यासाठी ब्राझीलचा संघ उत्सुक आहे. या सामन्यातील विजयासह ब्राझीलला बाद फेरीत पोहोचण्याबरोबर गटामध्ये अव्वल स्थान पटकावता येणार आहे. दुसरीकडे कॅमेरूनला अजूनही विश्वचषकामध्ये लय सापडलेली नसून गेल्या विश्वचषकासारखे या वेळीही ते गटामध्ये तळाला राहतील, असे अंदाज वर्तवले जात आहेत.
ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांना मेक्सिकोविरुद्धची कामगिरी नक्कीच पचनी पडली नाही. त्यामुळेच संघांची कामगिरी अधिकाधिक चांगली होण्यासाठी त्यांचे प्रयत्न जोरदार सुरू आहेत. नेयमार आणि थिआगो सिल्व्हा यांच्यावरच ब्राझीलचा संघ अवलंबून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ब्राझीलच्या अन्य खेळाडूंनी छाप पाडण्याची वेळ आली आहे.
दुखापतीने ग्रासलेला सॅम्युएल इटो पूर्णपणे फिट झाला असून कॅमेरूनसाठी ही आनंदाची बाब आहे.
कॅमेरूनपेक्षा ब्राझीलचे पारडे नक्कीच जड आहे. पण या विश्वचषकातील धक्कादायक निकालांची मालिका पाहता यजमानांना धक्का बसेल का, याची चिंता बऱ्याच जणांना भेडसावत असेल. ब्राझीलने हा सामना गमावल्यावर त्यांचे बाद फेरीतील स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ब्राझीलसाठी रात्र वैऱ्याची आहे.
सामना क्र. ३३
‘अ’ गट : ब्राझील वि. कॅमेरून
स्थळ :  इस्टाडिओ नॅशनल द ब्रासिलिया, ब्रासिलिया
वेळ :  (२४ जून) मध्यरात्री १.३० वा. पासून.

Story img Loader