‘‘ब्राझीलच्या संघाचा जर्मनीविरुद्धचा दारुण पराभव स्वीकारण्याजोगा नाही. तांत्रिक कौशल्य, सांघिक प्रयत्न, सुसूत्रता आणि शिस्त या गोष्टींना पर्याय नसल्याचे जर्मनीने ब्राझीलला दाखवून दिले आहे. या परिस्थितीला ब्राझीलमधील फुटबॉल नियंत्रित करणारे पदाधिकारीच कारणीभूत आहेत. ब्राझीलमधून युरोपला होणारी फुटबॉलपटूंची निर्यात थांबायला हवी,’’ असे मत ब्राझीलचे महान खेळाडू झिको यांनी व्यक्त केले आहे. ‘प्रतिपेले’ अशी बिरुदावली मिळालेले झिको यांचा सार्वकालीन महान खेळांडूमध्ये समावेश होतो.
‘‘युरोपातील क्लब्स ब्राझीलमधील प्रतिभावान खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करतात. ब्राझीलमधील १४-१५ वर्षांचे युवा खेळाडू युरोपात स्थायिक झाले आहेत. ते त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्षे युरोपात खेळतात आणि उत्तरार्ध ब्राझीलसाठी देतात. यामुळे ब्राझीलमधल्या स्थानिक क्लब आणि स्पर्धाचे नुकसान झाले आहे. भरमसाट प्रमाणावर होणारी निर्यात जोपर्यंत रोखली जात नाही, तोपर्यंत फुटबॉलला चांगले दिवस येणार नाहीत,’’ असे परखड मत झिको यांनी व्यक्त केले.
‘‘प्रशिक्षक स्कोलारी यांच्या कार्यपद्धतीत काही चूक नाही. मात्र आता संघाला नव्या विचारांची आवश्यकता आहे. म्युरिसी रामाल्हो हे प्रशिक्षकपदासाठी योग्य पर्याय आहेत. स्कोलारी यांचे लक्ष्य २०१३च्या कॉन्फडरेशन चषकाकडे होते. देशासाठी खेळताना समीकरणे बदलतात. हे त्यांनी लक्षात घेतले नाही. या पराभवातून बोध घेत ब्राझील फुटबॉल महासंघाने देशातील सर्व क्लब्स, प्रशिक्षक आणि अकादमी यांची गुप्त बैठक आयोजित करायला हवी. प्राथमिक स्तरावर फुटबॉलचा विकास होण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धाकडेही लक्ष द्यायला हवे,’’ असे ते म्हणाले.

Story img Loader