ब्राझीलच्या यशात सिंहाचा वाटा उचलणारा आघाडीवीर नेयमार शुक्रवारी कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या महत्त्वाच्या सामन्याला दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांनी नेयमारच्या दुखापतीबाबत गंभीर चिंता प्रकट केली आहे.
२२ वर्षीय नेयमारने शनिवारी पेनल्टी शूटआऊटमध्ये विजयी गोल साधून ब्राझीलला रोमहर्षक विजय मिळवून दिला आणि त्यामुळेच संघाने उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली आहे. संघाच्या यशाबाबत स्कोलारी समाधानी आहेत. नेयमारला दुखापतीतून सावरण्यासाठी किमान चार-पाच दिवस विश्रांतीची आवश्यकता आहे, असे स्कोलारी यांनी सांगितले.
आनंदाश्रू, हुंदके अन् जल्लोष..
ब्राझीलने संपूर्ण सामन्यादरम्यान सुस्कारा सोडला नाही. चिलीने अखेपर्यंत त्यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. प्रत्येक जण ब्राझीलच्या विजयासाठी देवाकडे प्रार्थना करीत होता. गोंझालो जाराची पेनल्टी हुकल्याच्या काही सेकंदांनंतरच ब्राझीलच्या चाहत्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. १४० मिनिटे चिलीने ब्राझीलवासीयांचे श्वास रोखून धरले होते, पण पाचव्या पेनल्टीनंतर यजमान देशाने सुटकेचा नि:श्वास सोडला. संपूर्ण देशभर हे हुंदके जाणवत होते.
ब्राझीलविनाच पुढील आठवडे मायदेशात विश्वचषकाचे सामने पाहावे लागतात की काय, या भीतीनेच गोलरक्षक ज्युलियो सेसारने सामना जिंकल्यानंतर मैदानावरच रडण्यास सुरुवात केली. संपूर्ण स्टेडियमभर फक्त हुंदक्यांचे आवाज येत होते. डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. हातातील रुमाल पूर्ण भिजून गेले होते. रिबेकाने आपल्या चार मुलींसह रेकिफेच्या ओलिंडामधील एका कॅफेमध्ये हा सामना पाहण्याचा निर्णय घेतला. ‘‘संपूर्ण सामनाभर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. जेव्हा चिली हरल्याचे समजले, तेव्हाच कुठे शांत झाले होते,’’ डोळे पुसतच रिबेकाची मुलगी क्लॅरिसा सांगत होती. कॅफेचा मालक रोजेरियो मध्ये मध्ये सामन्याचा वृत्तांत कथन करत होता. ‘‘पेनल्टी-शूटआऊट दरम्यान काय विचार करीत होतास?’’ हा एकमेव प्रश्न सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत गोलरक्षक ज्युलियो सेसारला विचारला. पुढची पाच मिनिटे त्याच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही. अनेक वेळा तो बोलण्याचा प्रयत्न होता, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. भावना दाटून आल्या होत्या, डोळे लालबुंद झाले होते. एकही शब्द न उच्चारता ही मुलाखत संपली.
कॅफेमधील वातावरणात आता जल्लोष सुरू झाला होता. ‘‘तुमचे जेवण समोर ठेवत आहे,’’ रोजेरियो म्हणाला. त्या वेळी मी त्याला एकच प्रश्न विचारला, ‘‘समजा ब्राझील हरला असता, तर तुम्ही पैसे कमावण्यासाठी कॅफे उघडा ठेवला असता का?’’ तोही सेसारप्रमाणे नि:शब्द झाला. त्याची नजर माझ्यावर खिळली. ‘‘प्रांत, संस्कृती आणि रंगाचा विचार केल्यास, ‘सेलेकाओ’ हाच सर्वाना बांधून ठेवणारा धागा आहे. जर आम्ही विश्वचषक जिंकला तर नक्कीच चांगले दिवस येतील,’’ त्याने दिलेले उत्तर सूचक होते. माझ्याशी बोलणे आटोपून रोजेरियो माइक घेऊन रस्त्यावर उतरला. राष्ट्रगीत गाणाऱ्या रोजेरियोच्या सूरात साऱ्यांनीच सूर मिसळला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा