यजमान ब्राझीलने दडपणाची तमा न बाळगता आपला खेळ उंचावत पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीवर थरारक विजय मिळवला. औपचारिकदृष्टय़ा ब्राझीलने ही लढत जिंकली, मात्र चिलीने आपल्या सर्वागसुंदर खेळाने जगभरातल्या चाहत्यांची मने जिंकली. घरच्या मैदानावर खेळत असल्याने ब्राझीलला प्रचंड पाठिंबा होता. त्या तुलनेत चिलीच्या समर्थकांची संख्या कमी होती, पण नशीब चिलीच्या बाजूने नव्हते. ब्राझीलचे खेळाडू मोठय़ा क्लब्सकडून खेळतात. व्यावसायिक आणि स्पर्धात्मक स्वरूपाच्या फुटबॉलचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. दुसरीकडे चिलीचे खेळाडूही क्लब फुटबॉल खेळतात. मात्र इंग्लिश प्रीमिअर लीगमधून खालच्या गटात रवानगी झालेल्या संघांचे ते प्रतिनिधित्व करतात. मोठय़ा खेळाडूंबरोबर खेळण्याची त्यांना संधी मिळत नाही, तसेच प्रतिस्पध्र्याना प्रचंड पाठिंबा असलेल्या वातावरणात खेळण्याचाही त्यांना अनुभव नाही. मात्र या सगळ्यांवर मात करून चिलीने ब्राझीलला टक्कर दिली. जोरदार आक्रमण करू शकणाऱ्या खेळाडूंची ब्राझीलकडे मोठी फळी आहे, मात्र चिलीच्या बचावापुढे ते नामोहरम झाले. चेंडूवर ताबा ठेवून तो पुढे नेणार तोपर्यंत चेंडू पुन्हा चिलीच्या खेळाडूंच्या ताब्यात असायचा, हे दृश्य वारंवार पाहायला मिळाले. आक्रमणावर भर देऊन चिलीला त्रस्त करायचे की बचावात्मक धोरण स्वीकारून थोडय़ा वेळाने हल्लाबोल करायचा, या पेचात ब्राझीलचा संघ सापडला होता.
चिलीचा संघ मात्र अचूक अभ्यास करून उतरला होता. ब्राझीलचा बचाव कमकुवत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी डावपेच रचले होते. अ‍ॅलेक्स सँचेझने सुरेख गोल करत हे सिद्धही केले. कागदावर ब्राझीलच्या तुलनेत चिली अननुभवी वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र चिलीचेच खेळावर नियंत्रण होते. ब्राझीलला गोल करण्यासाठी आणि चेंडूवर नियंत्रण मिळवण्यासाठी झगडावे लागत होते. ऐतिहासिक यशासाठी नशिबाची साथ मिळणे अत्यावश्यक असते. दुर्दैवाने याच मुद्दय़ावर चिलीचा संघ पिछाडीवर पडला. निर्धारित वेळेत १-१ अशी बरोबरी होती. शेवटच्या काही मिनिटांमध्ये चिलीच्या मॉरूसियो पिनिलाने शानदार प्रयत्न केला, मात्र या वेळी चेंडू गोलजाळ्याच्या वरून गेला. हे अंतर अगदीच कमी होते. हा गोल झाला असता तर चिलीला आघाडी मिळाली असती. चिलीचा बचाव चांगला असल्याने ब्राझीलला तो तोडणे कठीण गेले असते, मात्र तसे झाले नाही. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांचे खेळाडू दमले होते. चिलीने थोडासा वेळकाढूपणा केला, मात्र त्यांनी गोलसाठीचे प्रयत्न सोडले नाहीत. या टप्प्यातही त्यांनी ब्राझीलला वरचढ होऊ दिले नाही. अखेर हा मुकाबला पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.
शूटआऊट हे जुगारासारखे आहे. तुमच्या गोलरक्षकाने गोल अडवणे आणि आघाडीपटूने गोल करणे या दोन्ही गोष्टी जुळून येणे आवश्यक असते. ब्राझीलचा अनुभवी गोलरक्षक ज्युलियन सेसारने अनुभव पणाला लावत दोन किक अडवल्या. नेयमारने निर्णायक किकवर गोल करत आपले कर्तृत्व सिद्ध केले. चिलीच्या दमदार खेळामुळे अंतिम सोळामध्येच यजमान ब्राझीलवर गारद होण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले असते, मात्र ब्राझीलच्या खेळाडूंनी पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळ उंचावला. चिलीच्या जाराने मारलेली किक निर्णायक ठरणार होती, पण गोलपोस्टला लागून चेंडू बाहेर पडला. त्याचा प्रयत्न अचूकच होता, मात्र नशीब त्याच्या आणि चिलीच्या बाजूने नव्हते.
साखळी फेरीनंतर जिंकणे किती कठीण आहे, याचा प्रत्यय चिलीविरुद्धच्या सामन्याने ब्राझीलला आला आहे. त्यांना पुढच्या सामन्यात कोलंबियाचा सामना करायचा आहे. चाहत्यांच्या अपेक्षांचे प्रचंड ओझे ब्राझीलच्या प्रत्येक खेळाडूवर आहे. या अपेक्षांना सकारात्मकतेत ते कसे बदलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Story img Loader