हुकमी एक्का नेयमार दुखापतीतून सावरत आहे, हे ब्राझील संघासाठी आशादायी आहे. जांघेत आणि गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो शुक्रवारी कोलंबियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता होती. परंतु ब्राझील संघाच्या वैद्यकीय तज्ज्ञांनीच नेयमारच्या सुस्थितीची माहिती दिली आहे.
चिलीविरुद्ध झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्राझीलने विजय मिळवला होता. या सामन्यात नेयमारला दुखापतींनी त्रस्त केले होते. त्यामुळे ब्राझीलच्या टेरेसोपोलिस प्रशिक्षण केंद्रात त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याने सरावालाही प्रारंभ केला.
‘‘नेयमारच्या डाव्या जांघेत आणि उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. परंतु आता तो सावरत असून, संघासोबत त्याने सराव सुरू केला आहे,’’ असे संघाचे डॉक्टर जोस लुइस रुन्को यांनी सांगितले.
कोलंबियाविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना तीन दिवसांवर आला असताना ब्राझीलचा संघ पुरेसा सराव करीत नसल्याचे वृत्त ब्राझीलच्या वृत्तपत्रांमध्ये झळकले होते. परंतु रुन्को यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला.
‘‘सध्या संघातील खेळाडूंना विश्रांतीची आवश्यकता होती. चिलीविरुद्धच्या सामन्यात १२० मिनिटे ब्राझीलच्या संघाने लढा दिला. खेळाडूंच्या शारीरिक आणि भावनिक ताकदीचा मोठय़ा प्रमाणात कस या सामन्यात लागला. त्यामुळे माझ्या संघाने सराव करण्यापेक्षा खेळावे असे मला वाटते,’’ अशी प्रतिक्रिया रुन्को यांनी व्यक्त केली.
मंगळवारी फ्लुमिनेन्से येथील रिओ दी जानिरो क्लबच्या युवा संघाविरुद्धच्या सराव सामन्यात ब्राझीलने २-० असा विजय मिळवला. हे दोन्ही गोल पॉलिन्होने झळकावले. ब्राझीलच्या संघासोबत असलेला नेयमार या सामन्यात खेळू शकला नाही.
साखळी फेरीतील खराब कामगिरीमुळे टॉटेनहॅम हॉट्सपूरचा मध्यरक्षक पॉलिन्होला चिलीविरुद्धच्या सामन्यात वगळण्यात आले होते. परंतु कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात लुइस गुस्ताव्हो निलंबनामुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे पॉलिन्होला पुन्हा संघात स्थान मिळू शकेल. त्याशिवाय ब्राझीलचे प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी यांच्याकडे हर्नानीसला विश्वचषक स्पध्रेत पदार्पणाची संधी देण्याचा आणखी एक पर्याय उपलब्ध असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा