जगभरातील समस्त फुटबॉलप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचविणाऱ्या फिफा विश्वचषकाचा नारळ शुक्रवारी पहाटे फुटणार आहे. ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यात होणारा पहिला सामना एकतर्फी होईल, असा सट्टेबाजांचाही होरा आहे. क्रिकेटप्रमाणेच भारतात विश्वचषक फुटबॉलवर जोरदार सट्टा खेळला जातो. सट्टेबाजांनी ब्राझीललाच पसंती दिली आहे. तरीही क्रोएशियावर जुगार खेळणारे अनेक महाभाग आहेत. अगदी १० रुपयांपासून लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम सट्टय़ावर लावली जाते. महाविद्यालयीन युवकांमध्ये फिफाचे खास वेड आहे आणि ते आपला संपूर्ण पॉकेटमनी सट्टय़ात लावतात. त्यापैकी काही जिंकतात आणि मग जोरदार पार्टी होते. सामन्यात कोण जिंकणार इथपासून किती गोलने सामना ब्राझिलच्या खिशात जाणार, यावर सट्टा खेळला गेला आहे. नेयमारची चलती आहेच. पण क्रोएशियाच्या मारिओ मांझुकीकवरही सट्टेबाजांचे लक्ष आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सट्टय़ाला मान्यता आहे. पॅडी पावर, विल्यमहिल्स, बेट३६५, बेटफ्रेड, स्काय बेट, बेटफेअर, बेट विक्टर आदी आंतराष्ट्रीय सट्टेबाजीविषयक संकेतस्थळांनीही ब्राझीललाच सरस ठरविले आहे. त्यापाठोपाठ अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन आणि बेल्जिअमचा क्रमांक लागतो. भारतातही सट्टेबाजांनी हाच क्रम कायम ठेवून सट्टा घेण्यास सुरुवात केली आहे.
आजचा भाव :
ब्राझील : क्रोएशिया :
३५ पैसे (३/१); तीन रुपये (१०/१).
(ब्राझील जिंकले तर रुपयाला ३५ पैसे तर क्रोएशिया जिंकल्यास रुपयाला तीन रुपये मिळतील. कंसात आंतरराष्ट्रीय दर)
निषाद अंधेरीवाला
स्वयंगोलने एस्कोबारचा जीव घेतला!
फुटबॉलचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूने केलेल्या चुकांमुळे अनेक वेळा खूप आकांडतांडव करतात. कोलंबियाचा खेळाडू आंद्रेस एस्कोबार याने केलेला स्वयंगोल त्याच्यासाठी मृत्यूचेच निमंत्रण घेऊन आला. अमेरिकेत १९९४मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत कोलंबियाने अमेरिकेविरुद्ध १-२ असा पराभव स्वीकारला आणि या पराभवामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात आंद्रेस याने प्रतिस्पर्धी खेळाडूने मारलेला चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या गोलरक्षकाकडे चेंडू तटविला. मात्र त्याच्या फटक्यात एवढा वेग होता, की चेंडू थेट गोलमध्येच गेला व अमेरिकेला गोल बहाल करण्यात आला. याच गोलच्या आधारे अमेरिकेने सामना जिंकला. हा सामना झाल्यानंतर आंद्रेस हा अमेरिकेतील लास व्हेगास येथील आपल्या नातेवाइकांकडे जाणार होता, मात्र त्याऐवजी त्याने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतल्यानंतर दोन दिवसांनी तो मेडेलीन येथे आपल्या मित्रांसमवेत हॉटेलमध्ये गेला होता. तेथेच तीन माथेफिरूंनी त्याला गोळ्या घातल्या. एस्कोबारमुळेच कोलंबियाचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले व त्याच्या या अपराधाची शिक्षा आपण देत आहोत, असे त्या मारेक ऱ्यांनी ओरडून सांगितले होते.
खेळ मांडिला..
टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या साधनांनिशी रंगणारा डोंबाऱ्याचा खेळ आपण सारेच पाहतो. दूर ब्राझीलमध्ये फुटबॉल विश्वचषकाचा उत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. फुटबॉल मैदानाची छोटी प्रतिकृती आणि फुटबॉल या साहित्यांसह ब्राझीलची जर्सी परिधान केलेला हा कलाकार आपल्या अदाकारीने साओ पावलो शहरातल्या रस्त्यावर सर्वाचे लक्ष वेधत होता.