पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने आपण दुखापतीमधून शंभर टक्के सावरलो आहोत, याची प्रचिती धडाकेबाज खेळानिशी दिली. त्यामुळेच पोर्तुगालने विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या सराव सामन्यात आर्यलडवर ५-१ अशी मात केली.
आंतरक्लब स्पर्धेत रिअल माद्रिदकडून खेळणाऱ्या रोनाल्डोला याआधी झालेल्या दोन सराव सामन्यांमध्ये दुखापतीमुळे भाग घेता आला नव्हता. मात्र आर्यलडविरुद्ध सामन्यात तो सहभागी झाला. सामना सुरू झाल्यावर पहिल्याच मिनिटाला त्याने जोरदार चाल केली, मात्र आयरीश गोलरक्षक डेव्हिड फोर्डीने त्याचा प्रयत्न हाणून पाडला.
पोर्तुगाल संघाला विश्वचषक स्पर्धेतील साखळी गटात जर्मनी, घाना व अमेरिका यांच्याशी खेळावे लागणार आहे. सिल्वेस्ट्री व्हॅरेला याने दिलेल्या पासवर ह्य़ुगो अल्मेडा याने गोल करीत पोर्तुगालचे खाते उघडले. २०व्या मिनिटाला पोर्तुगालच्या फॅबिओ कोन्टेरो याने मारलेला चेंडू आयरीश खेळाडू रिचर्ड केओघ याच्या बुटाला लागून गोलात गेला. ३७व्या मिनिटाला रोनाल्डोने हेडिंगच्या साहाय्याने चेंडू गोलाच्या दिशेने तटविला, मात्र आयरीश गोलरक्षक फोर्डी याने परतविला. तथापि, रोनाल्डोचा सहकारी अल्मेडा याने शिताफीने हा चेंडू पुन्हा गोलात ढकलला व संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात आर्यलडच्या जेम्स मॅकलीन याने फ्री-किकचा फायदा घेत गोल केला व पोर्तुगालची आघाडी कमी केली. सामना संपण्यासाठी थोडा अवधी बाकी असताना पोर्तुगालच्या नानीने दिलेल्या पासवर व्हिएरिन्हा याने संघाचा चौथा गोल केला. कोन्टेरो याने आणखी एक गोल करीत संघास ५-१ अशी आघाडी मिळवून दिली. याच आघाडीच्या जोरावर पोर्तुगालने सामना जिंकला. पोर्तुगालच्या चालींमध्ये रोनाल्डोचा महत्त्वाचा वाटा होता. त्याचा खेळ पाहण्यासाठी येथे ४५ हजार प्रेक्षक
उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा