‘‘जगात ज्या काही अनावश्यक गोष्टी आहेत, त्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटबॉल!’’.. १९९८च्या विश्वचषकात ‘गोल्डन बूट’चे मानकरी ठरलेले क्रोएशियाचे महान खेळाडू डेव्होर सुकेर यांचे हे सुप्रसिद्ध वाक्य. स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात क्रोएशियाला १९९८मध्ये तिसऱ्या क्रमांकावर मजल मारून देताना सुकेर यांनी फक्त तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यातच नव्हे तर उपांत्य, उपांत्यपूर्व, उपउपांत्यपूर्व आणि साखळी फेरीत दोन गोल झळकावले होते. ‘‘फुटबॉलमधील छोटय़ा देशांची हीच खरी कमाल आहे. ज्या वेळी आम्ही दादा संघांना हरवत होतो, त्यावेळी आंतरराष्ट्रीय नकाशावर आम्ही क्रोएशियाचे नाव अधिक ठळकपणे उमटवत होतो!’’.. ही त्यांची संघाला तिसऱ्या क्रमांकावर मजल मारून दिल्यानंतरची प्रतिक्रिया. गेल्या १६ वर्षांत फिफा विश्वचषकातील क्रोएशियाचे अस्तित्व फक्त नावापुरतेच मर्यादित राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियाला मुख्य फेरीत पात्र ठरता आले नाही. तर २००२ (द. कोरिया-जपान) आणि २००६ (जर्मनी) या दोन विश्वचषकांत क्रोएशियाला साखळी फेरीचा अडथळाही पार करता आला नाही.
विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी काही दिवसांआधीच एका दूरचित्रवाणीवरील ‘हे तुम्हाला माहीत आहे का?’ या कार्यक्रमांत लुका मॉड्रिक हा कुठल्या संघाचा खेळाडू आहे, असा प्रश्न विचारला जात होता. विजेत्याला ५०० अमेरिकन डॉलरचे बक्षीसही दिले जाणार होते. पण सर्वाच्या मुखातून एकच उत्तर निघत होते, ते म्हणजे ‘रिअल माद्रिद’. आंतरराष्ट्रीय नकाशावर क्रोएशिया नावाचा देश आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्नही सूत्रसंचालन करणाऱ्याने विचारला. तेव्हा १०० टक्के जणांनी त्याचे उत्तर ‘नाही’ म्हणून दिले.
आता गुरुवारी मध्यरात्री रंगणाऱ्या ब्राझीलविरुद्धच्या सलामीच्या सामन्यातच क्रोएशियाचे भवितव्य पणाला लागणार आहे. सध्या क्रोएशिया फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या ४६ वर्षीय सुकेर यांच्या मते, ‘‘ब्राझीलसाठी आमच्याकडे ‘सरप्राइज पॅकेज’ आहे. हे पॅकेज म्हणजे रिअल माद्रिदचा लुका मॉड्रिक आणि सेव्हिलाचा इव्हान राकिटिक.’’ मॉड्रिकच्या सुरेख कामगिरीमुळे रिअल माद्रिदला गेल्या महिन्यात चॅम्पियन्स लीगचे दहावे जेतेपद मिळवता आले. मारियो मांझुकिक हा क्रोएशियाचा युरोपमधील सर्वात यशस्वी खेळाडू. या मोसमात बुंडेसलीगाचे जेतेपद पटकावणाऱ्या बायर्न म्युनिककडून खेळताना त्याने सर्वाधिक २१ गोल झळकावले आहेत. मांझुकिक हा क्रोएशियाचा आक्रमणातील सर्वात भरवशाचा आणि अनुभवी खेळाडू. इव्हिका ऑलिककडेही ९२ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव. २००५मध्ये ब्राझीलविरुद्धची मैत्रीपूर्ण लढत ऑलिकच्या सर्वोत्तम प्रदर्शनामुळेच १-१ अशी बरोबरीत सुटली होती. फिफा विश्वचषकातील एकमेव लढतीत क्रोएशियाला २००६मध्ये ०-१ असे पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर क्रोएशियाला ब्राझीलविरुद्ध एकही गोल लगावता आला नाही. या आकडेवारीमुळे सुकेर काहीसे नाराज झाले असावेत. त्यामुळे ‘अ’ गटातून ब्राझील आगेकूच करेल आणि कॅमेरून, मेक्सिको आणि क्रोएशियाला दुसऱ्या स्थानासाठी समान संधी आहे, हे त्यांचे वक्तव्य.
१९९८मध्ये फिफा विश्वचषकातील संघांची संख्या ३२वर नेण्यात आल्यानंतर साखळी गटात पहिला विजय मिळवणाऱ्या ८७ टक्के संघांनी दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे, असे आकडेवारी सांगते. ब्राझीलने आतापर्यंत पहिला सामना एकदाही गमावलेला नाही. त्यामुळे लुइस फिलिप स्कोलारी हेसुद्धा पहिल्या सामन्यात तीन गुणांची कमाई करण्यासाठी उत्सुक आहेत. मंगळवारी आपल्या भाच्याचा गंभीर अपघात झाल्यानंतरही ब्राझीलच्या सराव शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात व्यग्र असणाऱ्या स्कोलारी यांच्या राष्ट्रसेवेमुळे त्यांच्याबाबतचा आदर आणखीन वाढला. डेव्हिड लुइझ, ऑस्कर, रामिरेस, विलियन, हल्क, फ्रेड आणि नेमयार या ब्राझीलच्या युवा खेळाडूंचे स्कोलारी यांच्याशी असलेले नाते हे वडिलांप्रमाणेच. गुरुवारपासून पूर्ण महिनाभर त्यांचे लक्ष असेल ते विश्वचषक उंचावण्याकडे. यावरूनच फुटबॉलचे अफाट वेड असलेल्या ब्राझीलवासियांसाठी विश्वचषकाचे किती महत्त्व आहे, हे अधोरेखित होते.