पुढील महिनाभर थरारनाटय़ाची अनुभूती फुटबॉलचाहत्यांना घेता येणार आहे. ‘गेट, सेट, गोल..’ असे म्हणत या थरारनाटय़ाला सुरुवात होणार आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या महाकुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे ती यजमान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याने. यंदाच्या विश्वचषकाचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून ब्राझीलकडे पाहिले जात आहे. त्यामुळे क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांना विजयासाठी झगडावे लागणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. विश्वविजयाच्या मोहिमेची सुरुवात विजयानिशी करण्यासाठी ब्राझील सज्ज झाला आहे, तर दुसरीकडे ब्राझीलसारख्या संघाला धक्का देण्याच्या तयारीत क्रोएशियाचा संघ आहे.
संघाचे प्रशिक्षक लुइस फेलिप स्कोलारी आपल्या संघासह पहिल्या सामन्यासाठी सज्ज असून, याच संघाने विश्वविजेत्या स्पेनलाही कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम फेरीत गेल्या वर्षी ३-० असा धक्का दिला होता. दुसरीकडे क्रोएशियाचा संघ हा मधली फळी आणि बचाव फळीवर मुख्यत्वे करून अवलंबून असेल. पण सध्याचा दोन्ही संघांचा फॉर्म पाहता ब्राझीलचा संघ नक्की क्रोएशियापेक्षा वरचढ ठरू शकेल.
पाच वेळा विश्वविजयाचा पताका फडकवणारा ब्राझील संघ अ गटात क्रोएशिया, मेक्सिको आणि कॅमेरून या संघावर वर्चस्व गाजवून अव्वल स्थानी पोहोचेल, असे म्हटले जात आहे. नेयमार हा ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू कशी कामगिरी करतो, यावर त्यांचे विजयाचे समीकरण अवलंबून असेल.
दुसरीकडे नोव्हेंबरमध्ये लाल कार्ड मिळाल्याने क्रोएशियाचा आक्रमकवीर मारियो मांझुकिकला या सामन्यात खेळता येणार नाही, त्यामुळे क्रोएशियाची मदार लुका मॉड्रिकवर असेल.
यजमान या नात्याने थेट मुख्य फेरीत स्थान मिळाल्यामुळे ब्राझीलचा संघ नव्या दमाने या स्पर्धेत उतरणार आहे. सोमवारी सराव करताना नेयमारच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने प्रशिक्षक स्कोलारी यांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र बुधवारी संघासोबत कसून सराव करत नेयमारने आपल्या तंदुरुस्तीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. क्रोएशियाने प्ले-ऑफ फेरीत आइसलँडवर २-० अशा फरकाने मात करून विश्वचषकात स्थान मिळवले होते. नुकत्याच झालेल्या माली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही त्यांनी विजय साकारला होता. या स्पर्धेत क्रोएशिया संघ ‘डार्क हॉर्स’ म्हणून ओळखला जात आहे.

सामना क्र. फ
‘अ’ गट : ब्राझील वि. क्रोएशिया
स्टेडियम अरेना कोरिनथिअन्स, साओ पावलो
लक्षवेधी खेळाडू
नेयमार (ब्राझील) : ब्राझीलच्या संघातील सर्वात नावाजलेला खेळाडू म्हणजे आघाडीपटू नेयमार. आतापर्यंत ब्राझील आणि बार्सिलोनासाठी खेळताना नेयमार बऱ्याचदा चमकताना दिसला. ब्राझीलच्या संघाचा नेयमार हा कणा असेल. त्यामुळे नेयमार हा सर्वच प्रतिस्पध्र्याच्या रडारवर असून, त्याला रोखण्यासाठी प्रतिस्पर्धी प्रयत्नांची शर्थ करतील. वेगवान खेळासाठी नेयमार प्रसिद्ध असला, तरी सध्याच्या घडीला तो सर्वोत्तम फॉर्मात नसल्याचे म्हटले जात आहे.
लुका मॉड्रिक (क्रोएशिया) : क्रोएशियाचा संघ लुका मॉड्रिकवर मुख्यत्वे अवलंबून आहे. मधल्या फळीतील अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून लुका प्रसिद्ध आहे. प्रतिस्पध्र्यावर आक्रमणाची पायाभरणी करण्यामध्ये लुकाचा हातखंडा आहे. त्याचबरोबर संघाला जेव्हा बचावात्मक खेळाची गरज असते तेव्हा लुका संघाचा एक अविभाज्य भाग होतो. त्यामुळे जर क्रोएशियाला ब्राझीलला धक्का द्यायचा असेल तर ते लुकाला कधी आणि कसे वापरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

व्यूहरचना
मतमतांतरे
दानी अल्वेझ (ब्राझील) : पहिला सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. कारण स्पर्धेची सुरुवात कशी होते, यावर बरेच काही अवलंबून असते. त्यामुळे पहिल्या सामन्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आम्हाला विश्वचषकाचा आनंद लुटायचा आहे आणि संघाचा मनोबल कमालीचे उंचावलेले आहे. संघाची पूर्वतयारी उत्तम झाली असून पहिल्या सामन्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.

लुका मॉड्रिक (क्रोएशिया) : विश्वचषक म्हटला की प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. जो संघ चांगली कामगिरी करतो तोच विजयी ठरत असतो. आमच्या संघात चांगली गुणवत्ता असून ब्राझीलला धक्का देण्याची कुवत आमच्यामध्ये आहे. नेयमार हा ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू असला तरी तो सध्या फॉर्मात दिसत नाही. त्यामुळे प्रयत्नांची शर्थ केल्यास आम्ही ब्राझीलला नक्कीच धक्का देऊ शकतो.

आमने-सामने
सामने : १
ब्राझील :     विजय १,     पराभव ०.
क्रोएशिया : विजय ०,     पराभव १.
गोल : ब्राझील १, क्रोएशिया ०.

    

Story img Loader