पुढील महिनाभर थरारनाटय़ाची अनुभूती फुटबॉलचाहत्यांना घेता येणार आहे. ‘गेट, सेट, गोल..’ असे म्हणत या थरारनाटय़ाला सुरुवात होणार आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या महाकुंभमेळ्याची सुरुवात होणार आहे ती यजमान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याने. यंदाच्या विश्वचषकाचा सर्वात प्रबळ दावेदार म्हणून ब्राझीलकडे पाहिले जात आहे. त्यामुळे क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यामध्ये त्यांना विजयासाठी झगडावे लागणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. विश्वविजयाच्या मोहिमेची सुरुवात विजयानिशी करण्यासाठी ब्राझील सज्ज झाला आहे, तर दुसरीकडे ब्राझीलसारख्या संघाला धक्का देण्याच्या तयारीत क्रोएशियाचा संघ आहे.
संघाचे प्रशिक्षक लुइस फेलिप स्कोलारी आपल्या संघासह पहिल्या सामन्यासाठी सज्ज असून, याच संघाने विश्वविजेत्या स्पेनलाही कॉन्फेडरेशन चषकाच्या अंतिम फेरीत गेल्या वर्षी ३-० असा धक्का दिला होता. दुसरीकडे क्रोएशियाचा संघ हा मधली फळी आणि बचाव फळीवर मुख्यत्वे करून अवलंबून असेल. पण सध्याचा दोन्ही संघांचा फॉर्म पाहता ब्राझीलचा संघ नक्की क्रोएशियापेक्षा वरचढ ठरू शकेल.
पाच वेळा विश्वविजयाचा पताका फडकवणारा ब्राझील संघ अ गटात क्रोएशिया, मेक्सिको आणि कॅमेरून या संघावर वर्चस्व गाजवून अव्वल स्थानी पोहोचेल, असे म्हटले जात आहे. नेयमार हा ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू कशी कामगिरी करतो, यावर त्यांचे विजयाचे समीकरण अवलंबून असेल.
दुसरीकडे नोव्हेंबरमध्ये लाल कार्ड मिळाल्याने क्रोएशियाचा आक्रमकवीर मारियो मांझुकिकला या सामन्यात खेळता येणार नाही, त्यामुळे क्रोएशियाची मदार लुका मॉड्रिकवर असेल.
यजमान या नात्याने थेट मुख्य फेरीत स्थान मिळाल्यामुळे ब्राझीलचा संघ नव्या दमाने या स्पर्धेत उतरणार आहे. सोमवारी सराव करताना नेयमारच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने प्रशिक्षक स्कोलारी यांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र बुधवारी संघासोबत कसून सराव करत नेयमारने आपल्या तंदुरुस्तीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. क्रोएशियाने प्ले-ऑफ फेरीत आइसलँडवर २-० अशा फरकाने मात करून विश्वचषकात स्थान मिळवले होते. नुकत्याच झालेल्या माली आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही त्यांनी विजय साकारला होता. या स्पर्धेत क्रोएशिया संघ ‘डार्क हॉर्स’ म्हणून ओळखला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा