१९९८ आणि २००२च्या विश्वचषकात रोनाल्डोसारख्या महान फुटबॉलपटूचा खेळ पाहून नेयमारने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. एके दिवशी आपल्यालाही विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करायचे हे त्याचे लहानपणापासूनचे स्वप्न. हे स्वप्न उराशी बाळगत त्याने ब्राझीलच्या रस्त्यांवर फुटबॉलचे धडे गिरवले. त्याच्या या प्रवासात वडिलांनी त्याला मोलाची साथ दिली. मैदानावर देशातर्फे खेळत असताना नकारात्मकता झटकून, खिलाडीवृत्तीने आणि खेळाचा आनंद लुटण्यासाठी जिवाची बाजी लाव, हा त्याच्या वडिलांचा कानमंत्र. म्हणूनच तो सकारात्मक असताना त्याला कुणीही रोखू शकले नाही.
मायदेशात सुरू असलेल्या विश्वचषकाचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न घेऊन तो उतरला नाही, तर २० कोटी ब्राझीलवासीयांच्या अपेक्षांचे दडपण त्याच्यावर होते. पेले, काका, रोनाल्डिन्हो, रोनाल्डो आणि रिवाल्डो या ब्राझीलच्या १० क्रमांकाच्या जर्सी घालणाऱ्या महान खेळाडूंइतकेच किंबहुना जास्त दडपण नेयमारवर होते. ब्राझिलियन फुटबॉलची कलात्मकता, शैली, दर्जा पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध करण्याचे हे दडपण होते. ‘दुसरा पेले’ म्हणून त्याची ओळख बनू लागली. २२व्या वर्षीच ‘नव्या युगाची आशा’ म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.
१९५०मध्ये मायदेशातील मॅराकानाच्या ऐतिहासिक स्टेडियमवर विश्वविजेतपद हुकल्याचे दु:ख ब्राझीलवासीयांना बोचत होते. खरे तर ब्राझीलवासीय भ्रष्टाचार, शिक्षणाचा अभाव, दारिद्रय़ यामुळे ग्रासलेले. त्यामुळेच गेल्या वर्षी कॉन्फेडरेशन चषकाच्या वेळी त्यांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. फुटबॉलवेडय़ा ब्राझीलच्या चाहत्यांचा हा आक्रोश खेळाडूंविरुद्ध नव्हे तर सरकारविरोधात होता. नेयमारने त्या वेळी देशवासीयांचे सांत्वन करायचा प्रयत्न केला होता. दु:खद जीवन जगणाऱ्या देशवासीयांना आनंदाचे क्षण द्यावेत, हे नेयमारचे प्रयत्न होते. ‘‘आता परिस्थिती निवळू लागली आहे. त्यामुळे ब्राझीलला विश्वचषक जिंकून देत लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवण्याची जबाबदारी आता आमची आहे,’’ हे विश्वचषकाला सुरुवात होण्याआधीचे त्याचे वाक्य. उद्घाटनाच्या सामन्यात दोन गोल करून त्याने ब्राझीलला घरच्या मैदानावर सहावे जेतेपद मिळवून देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते.
चिलीविरुद्धच्या बाद फेरीच्या सामन्याआधी दुखापतीमुळे नेयमारच्या समावेशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण तमाम देशवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तो मैदानावर उतरला, जिद्दीने लढला. ब्राझीलचा विजयरथ जसजसा पुढे सरकत होता, तसतशा नेयमारकडून अपेक्षा वाढत जात होत्या. वडिलांच्या सल्ल्याप्रमाणे नेयमारने एका परिपक्व खेळाडूप्रमाणे हे दडपण झेलले. पण कदाचित नशीब त्याच्या बाजूने नव्हतेच. प्रतिस्पर्धी संघातील अव्वल खेळाडूंना लक्ष्य करणे, ही ‘युद्धनीती’ सध्या पाहायला मिळत आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना घेराव घालून रोखल्याची रणनीती यशस्वी ठरली. त्यामुळेच ब्राझीलनेही कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात या विश्वचषकातील ‘युवा तारा’ जेम्स रॉड्रिगेझला रोखण्याचे प्रयत्न केले. पण ही युद्धनीती त्यांच्याच अंगलट आली. जुआन कॅमिलो झुनिगा या कोलंबियाच्या बचावपटूने नेयमारला जाणूनबुजून पाडले, तेव्हाच नेयमारला प्रचंड वेदना सुरू झाल्या होत्या. मैदानावरून थेट नेयमारला फोर्टालेझामधील साओ कालरेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा रुग्णालयासमोर ब्राझीलच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. पण नेयमार स्पर्धेला मुकणार, ही बातमी येऊन धडकली तेव्हा चाहत्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. आता ब्राझीलचे विश्वचषकाचे स्वप्न अधुरेच राहणार का, अशी चिंता यजमान चाहत्यांना सतावत आहे.
कर्णधार थिआगो सिल्वा, बचावपटू डेव्हिड लुइझ आणि लुइझ गुस्ताव्हो हे ब्राझीलच्या संघातील अव्वल फुटबॉलपटू. पण संपूर्ण ब्राझीलवासीयांच्या नजरा खिळल्या होत्या त्या नेयमारच्या कामगिरीकडे. आता नेयमार या स्पर्धेतून बाहेर पडल्याची कल्पनाच ब्राझीलवासीयांना करवत नाही. आपल्या अपेक्षांचे ओझे उचलणारा नेयमार आता धारातीर्थी पडला, पण नेयमारविना खेळणाऱ्या ब्राझीलला या दुखापतीची मोठी किंमत मोजावी लागणार, असे दिसत आहे. पण ‘गेट वेल सून’ अशीच प्रार्थना ब्राझीलवासीय देवाकडे करीत आहेत.

Story img Loader