नेयमार फक्त ब्राझीलचे विश्वचषकाचे स्वप्न घेऊन फुटबॉलच्या महाकुंभमेळ्यात खेळला नाही, तर त्याने आपल्या अफाट कौशल्याद्वारे ब्राझीलला यश मिळवून दिले. पण कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेयमारच्या मणक्याच्या हाडाला गंभीर इजा पोहोचल्यामुळे त्याला या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे थिआगो सिल्वावर दोन पिवळ्या कार्डमुळे पुढील सामन्यात आलेली बंदी आणि नेयमारची दुखापत यामुळे जर्मनीविरुद्ध ‘अब तेरा क्या होगा, ब्राझील’ अशीच चिंता यजमान चाहत्यांना सतावत आहे. मैदानावरूनच थेट हॉस्पिटलमध्ये रवानगी झालेला नेयमार उपचारानंतर संघाच्या आनंदात सामील होण्यासाठी व्हीलचेअरवरून आला होता.
दुसऱ्या सत्रात चेंडूवर ताबा मिळवताना कोलंबियाचा बचावपटू जुआन कॅमिलो झुनिगाने नेयमारला पाठीला धरून जमिनीवर आदळले होते. मैदानावर पडताच क्षणी नेयमारने किंकाळी फोडली होती. त्यावरूनच काहीतरी विपरीत घडले असावे, अशी कल्पना चाहत्यांना आली होती. पाठीचा एक्स-रे काढण्यात आल्यानंतर त्याच्या मणक्याचे हाड तुल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे नेयमारला पुढील चार आठवडे खेळता येणार नाही. नेयमारच्या दुखापतीबद्दल प्रशिक्षक लुइस फेलिपे स्कोलारी म्हणाले की, ‘‘नेयमारला पाडणाऱ्या झुनिगाला रेफ्रींनी साधे पिवळे कार्ड दाखवण्याचे धाडस केले नाही. पण काहीही न करणाऱ्या सिल्वाला मात्र त्यांनी पिवळे कार्ड दाखवले.’’ नेयमार लवकर बरा होण्यासाठी मेसूत ओझिल, लिओनेल मेस्सी आणि मारिओ बालोटेल्ली या दिग्गज फुटबॉलपटूंनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘‘नेयमार मित्रा, तू लवकरच बरा होशील, अशी आशा आहे,’’ असे मेस्सीने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा