ब्राझीलचा दुखापतग्रस्त आक्रमणवीर नेयमार शनिवारी नेदरलँड्सविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीला हजेरी लावणार आहे. नेयमारच्या अनुपस्थितीमुळे खचलेल्या ब्राझीलचा जर्मनीने ७-१ असा धुव्वा उडवला. कोलंबियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मणक्याला दुखापत झाल्यामुळे नेयमारला विश्वचषक स्पध्रेतून माघार घ्यावी लागली होती.
‘‘नेयमार ब्राझीलच्या सराव शिबिराला येणार आहे, याचप्रमाणे शनिवारी होणाऱ्या लढतीप्रसंगी तो संघासोबत असेल,’’ अशी माहिती ब्राझील फुटबॉल महासंघाचे प्रवक्ते रॉड्रिगो पैवा यांनी सांगितले.
बुधवारी अर्जेटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी हार पत्करल्यामुळे नेदरलॅण्ड्सचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. याविषयी नेदरलॅण्ड्सचे प्रशिक्षक लुईस व्हॅन गाल म्हणाले की, ‘‘हा सामना कधीच खेळला जाऊ नये, असे मला वाटते. आम्हाला या सामन्याच्या तयारीसाठी प्रतिस्पर्धी संघापेक्षा एक दिवस कमी मिळणार आहे. त्यामुळे ओळीने दुसऱ्या पराभवाची शक्यता अधिक वाढते.’’

Story img Loader