नव्या जर्सीनिशी पोर्तुगालचा संघ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. परंतु महत्त्वाचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या तंदुरुस्तीची त्यांना चिंता लागली आहे. विश्वचषक आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही वार्ता पोर्तुगालसाठी नक्कीच चांगली नाही.
रोनाल्डोने गतवर्षी फिफाचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला होता. परंतु सध्या रोनाल्डो दुखापतींशी गांभीर्याने सामना करीत आहे. पोर्तुगाल फुटबॉल असोसिएशनने रोनाल्डोच्या वैद्यकीय अहवालानंतर आपली चिंता प्रकट केली.
सध्या रोनाल्डोसह रॉल मिरेलिस, पेपे आणि बेटो हे न्यूयॉर्क जेट्स प्रशिक्षण केंद्रात तंदुरुस्तीवर विशेष भर देत आहेत. १२ जूनपासून सुरू होणारी विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने त्यांना पाठवण्यात आले आहे. पोर्तुगालचा समावेश ग-गटात करण्यात आला असून, १६ जूनला त्यांचा पहिला सामना जर्मनीविरुद्ध रंगणार आहे.
‘‘रोनाल्डो विश्वचषकासाठी तंदुरुस्त होईल आणि त्याची संघाला चांगली मदत होईल,’’ असे नानीने सांगितले.

विश्वविजेतेपदासाठी दावेदार मानल्या जाणाऱ्या ब्राझीलने घरच्या मैदानावरील सराव सामन्यात पनामा संघावर ४-० असा दणदणीत विजय मिळवत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी अन्य संघांना इशारा दिला आहे. या एकतर्फी सामन्यात ब्राझीलकडून नेयमार, डॅनियल अल्वीस, हुल्क व विलियन यांनी प्रत्येकी एक गोल केला. या लढतीत अपेक्षेप्रमाणे ब्राझीलच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले, मात्र खाते उघडण्यासाठी त्यांना अर्धा तास वाट पाहावी लागली.