तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असून चालत नाही तर गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही देदीप्यमान कामगिरी केलीत तर यशाबरोबर, प्रसिद्धी आणि त्यामागून अवचितपणे पैशांच्या राशीही तुमच्या पदरात पडतात. पोर्तुगालचा अचाट गुणवत्ता असलेला फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या बाबतीतही असेच काहीसे पाहायला मिळते. आतापर्यंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर रोनाल्डोने जबरदस्त पैसाही कमावला असून, श्रीमंत फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीमध्ये त्याने अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सी आणि इंग्लंडच्या वेन रुनी यांनाही मागे टाकले आहे. या श्रीमंत फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळते.
‘वेल्थ-एक्स’ या आर्थिक क्षेत्रातील कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार रोनाल्डोची वार्षिक मिळकत २३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी असून, त्याची तिमाही मिळकत हीसुद्धा दहा खेळाडूंच्या एकत्रित मिळकतीइतकी आहे, असा निष्कर्ष या कंपनीने काढला आहे.
इंग्लंडचे खेळाडू या यादीमध्ये सर्वाधिक दिसतात. आघाडीपटू रुनीची मिळकत ९५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. मधल्या फळीतील फ्रँक लॅम्पर्डची मिळकत ६० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी असून, स्टिव्हन गेरार्डची मिळकत ५५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी आहे.
२०१०च्या विश्वचषक विजेत्या स्पेनच्या संघामध्ये सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू फर्नाडो टोरेस असून त्याची मिळकत ५० दशलक्ष अमेरिकन
डॉलर्स एवढी आहे. यजमान ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेयमारची
मिळकत २५ दशलक्ष अमेरिकन
डॉलर्स एवढी असून, इटलीचा
सर्वात महत्त्वाचा फुटबॉलपटू
असलेल्या जिआनलुइगी बफनची मिळकत ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी आहे.
श्रीमंत रोनाल्डोपंत
तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असून चालत नाही तर गुणवत्तेच्या जोरावर तुम्ही देदीप्यमान कामगिरी केलीत तर यशाबरोबर, प्रसिद्धी आणि त्यामागून अवचितपणे पैशांच्या राशीही तुमच्या पदरात पडतात.
First published on: 12-06-2014 at 05:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2014 richest footballers