एकापेक्षा एक खेळाडू, प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास आणि सर्वसमावेशक खेळ या वैशिष्टय़ांच्या जोरावर गतविजेता स्पेनचा संघ यंदाही विश्वचषक जिंकेल, असा अंदाज फुटबॉल अभ्यासकांनी वर्तवला आहे. स्वित्र्झलडस्थित सीआयईएस फुटबॉल अभ्यास संस्थेने विश्वचषकात सहभागी होणाऱ्या ३२ संघांचा तपशीलवार अभ्यास केला. या अभ्यासानुसार विश्वचषक जेतेपदासाठी स्पेनलाच पसंती देण्यात आली आहे. अंतिम लढतीत स्पेन ब्राझीलवर मात करेल. अर्जेटिना तिसऱ्या स्थानी तर फ्रान्सचा संघ चौथ्या स्थानी असेल असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे. या अभ्यासकांनी अर्थमितीय संकल्पनांच्या आधारे खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषण केले आहे.
विश्वचषकाच्या साखळी फेरीचे सामने, प्रत्येक खेळाडूने कारकिर्दीत आतापर्यंत केलेले गोल, विशेषत्वाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या गोलांची संख्या, २०१२पासून किती सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच विश्वचषकाच्या किती सामन्यांत खेळाडू सहभागी झाला आहे, या निकषांवर हा अभ्यास आधारलेला आहे. या त्रराशिकांनुसार ३२ विविध संघांच्या सर्व खेळाडूंना अभ्यासण्यात आले आणि त्यानुसार स्पेनच जेतेपदाचा दावेदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बाद फेरीच्या लढतीत ब्राझील बलाढय़ नेदरलँड्सवर मात करेल, असा होरा वर्तवण्यात आला आहे. इटली जपानचे आव्हान संपुष्टात आणेल तर फ्रान्स नायजेरियावर मात करेल व पोर्तुगाल रशियावर विजय मिळवेल, असा अंदाज या संस्थेने मांडला आहे.
अंतिम १६मध्ये स्पेन क्रोएशियाला नमवण्याची शक्यता आहे तर वेन रुनीचा इंग्लंड कोलंबियाला गाशा गुंडाळायला लावेल, तर लिओनेल मेस्सीचा अर्जेटिना संघ इक्वेडोरला मायदेशात पाठवेल व बलाढय़ जर्मनी बेल्जियमचे आव्हान संपुष्टात आणेल, असा या अभ्यासकांचा दावा आहे. या समीकरणांमुळे उपांत्यपूर्व फेरीत ब्राझील इटलीवर मात करेल व फ्रान्स पोर्तुगालला पराभवाचा धक्का देईल. गतविजेता स्पेन इंग्लंडला नमवेल तर अर्जेटिना मातब्बर जर्मनीला घरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे. उपांत्य फेरीत ब्राझील फ्रान्सवर मात करेल तर स्पेन अर्जेटिनावर विजय मिळवेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
विजेतेपदासाठी पसंती
१. स्पेन
२. ब्राझील
३. अर्जेटिना
४. फ्रान्स

सामना क्र. ळ
‘ब’ गट : स्पेन वि. नेदरलँड्स
स्थळ : अरेना फाँट नोव्हा, सॅल्व्हाडोर
लक्षवेधी खेळाडू
आंद्रेस इनिएस्टा (स्पेन) : मधल्या फळीतील जगातील अव्वल खेळाडू म्हणून आंद्रेस इनिएस्टाची ओळख आहे. कारण आतापर्यंतचा त्याचा खेळ पाहता आक्रमण आणि बचाव या दोन्ही गोष्टी त्याने चपखलपणे केलेल्या सर्वानीच पाहिल्या आहेत. गोल करण्यासाठी सहकाऱ्यांना मदत करणे असो किंवा प्रतिस्पध्र्याच्या गोलपोस्टवर हल्ला चढवणे असो, या दोन्ही गोष्टींमध्ये आंद्रेस माहीर आहे. त्यामुळे स्पेनचा विजयरथ ओढण्यामध्ये आंद्रेसचा मोठा वाटा ठरू शकतो.

रॉबिन व्हॅन पर्सी (नेदरलँड्स) : डच संघाचा कर्णधार आणि जोरदार आक्रमण लगावणारा फुटबॉलपटू म्हणजे रॉबिन व्हॅन पर्सी. नेदरलँड्सच्या संघाची एक वेगळी ओळख रॉबिनने गेल्या काही वर्षांमध्ये बनवली आहे. गेल्या विश्वचषकातील स्पेनविरुद्धच्या सामन्यात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी गतअनुभवातून बरेच काही रॉबिन शिकला आहे. त्यामुळे जर नेदरलँड्सला स्पेनविरुद्ध वचपा काढायचा असेल, तर त्यांच्यासाठी रॉबिन हा हुकमी एक्का असेल.

व्यूहरचना
प्रतिक्रिया
विश्वचषक जिंकण्याकरिता आमच्यासाठी ही एक नामी संधी आहे आणि या क्षणाच्या आम्ही फार जवळ आहोत. स्पेनविरुद्धचा पहिला सामना हे आमच्यापुढील मोठे असेल. कारण गेल्या विश्वचषकात त्यांनी आम्हाला कडवी झुंज देत पराभूत केले होते. पण त्यानंतर बरेच काही बदलले असून संघासाठी चांगली कामगिरी करण्याची इच्छा मनामध्ये आहे.
– रॉन व्लार, नेदरलँड्स

आम्हाला या क्षणी कसलीच भीती नाही, पण आमच्या मनात प्रतिस्पध्र्याविषयी आदराची भावना नक्कीच आहेच. नेदरलँड्सच्या संघामध्ये चांगला समन्वय पाहायला मिळतो, त्यांचे प्रशिक्षकही चांगले आहेत. आमच्यासाठी ते नक्कीच कडवे आव्हान उभे करतील, पण संघाचे मनोबल कमालीचे उंचावले असून आम्ही पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहोत.
– व्हिन्सेंट डेल बॉस्के, स्पेन

आमने-सामने
सामना : १
स्पेन : विजय १